नागपूर : नागपुरात उन्हाळ्यात शहराचे तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. शहरातील चौकांमध्ये सिग्नलवर उभे दुचाकीधारक अक्षरश: होरपळून निघतात. अनेकजण उष्माघाताचे बळीही ठरतात. या तीव्र उन्हापासून चौकातील वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी नागपूर महापालिकेने एक अनोख्या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातून महापालिकेला वीज निर्मितीही करता येणार आहे. त्यामुळे महापालिकेचा विजेवरील खर्चही कमी होणार असून उन्हाळ्यात नागरिकांना सावली मिळणार आहे.
नागपूर महापालिकेने शहरातील गर्दीच्या प्रमुख चौकांमध्ये ‘सोलर रूफटॉप शेड’ तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी महापालिकेकडून स्पर्धा घेण्यात येत असून तज्ज्ञांकडून आलेखन मागितले आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यास राज्यातील इतर शहरांसाठी पथदर्शी ठरण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडून उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये चौकांमध्ये ‘ग्रीन नेट’ लावण्याचे नियोजन आहे. दरवर्षी महापालिका शहरातील संविधान चौकासह इतर चौकांमध्ये हा उपाय करीत असते. परंतु, यावर महापालिकेचा खर्च होता. आता खर्च केल्यानंतर त्यातून उत्पन्नासोबत ऊर्जानिर्मिती व नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या वाहतूक विभागाने या संकल्पनेवर पुढाकार घेतला आहे. सिग्नल असलेल्या गर्दीच्या चौकात ‘सोलर रूफ टॉप’ उभारून चौकात भर उन्हात उभ्या राहणाऱ्या वाहनचालकांचा बचाव होईल. त्याचप्रमाणे सोलरच्या पॅनेलमधून विजेची निर्मिती होणार आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाला सुद्धा हातभार लागणार आहे. यावर जाहिरातदारांना साईन बोर्ड लावण्याची संधी मिळणार असल्याने महापालिकेच्या महसुलात भर पडणार असून या प्रकल्पाचा खर्चही यातून काढता येणार आहे. शहराच्या सौंदर्यीकरणातही यामुळे भर पडणार आहे.
६ ते २० एप्रिलदरम्यान स्पर्धा
रणरणत्या उन्हापासून वाहनचालकांचा बचाव करण्यासाठी महापौर नीता ठाकरे आणि स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी ‘सोलर रूफ टॉप शेड’ स्पर्धेची संकल्पना बैठकीत मांडली होती. त्यानुसार शहरातील अभियांत्रिकी विद्यार्थी, व्यावसायिक व तज्ज्ञ सल्लागारांकडून नवीन संकल्पनांसह आलेखन मागवले आहे. यासाठी ६ ते २० एप्रिलदरम्यान स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातील निवडक आलेखनाचे सादरीकरण २४ एप्रिल रोजी मनपा मुख्यालयात करण्यात येणार आहे.
२५ ते १७ हजारांपर्यंत रोख पुरस्कार
शहरातील अभियांत्रिकीचे विद्यार्थी, व्यावसायिक, तज्ज्ञ सल्लागारांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. स्पर्धेतील पहिल्या विजेत्याला २५ हजार, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला २१ हजार व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला १७ हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी http://www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच आपले आलेखन eetrafficnmc01@gmail.com वर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
