क्रीडा साहित्य घोटाळ्यात खोपडे, कुंभारेंसह १०९ जणांवर आरोप निश्चित

महापालिकेत नगरसेवकांना त्यांच्या मतदारसंघात खर्च करण्यासाठी एक निधी मिळतो.

 

मनपाच्या ५० अभियंत्यांचा समावेश, आता पुरावे तपासणार

बहुचर्चित नागपूर महापालिकेतील क्रीडा साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तत्कालीन नगरसेवक आणि विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे यांच्यासह एकूण १०९ माजी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी फसवणूक आणि बनावट दस्तावेज तयार करण्यांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. आता या प्रकरणात १९ सप्टेंबरपासून साक्षीपुरावे तपासण्यात येतील.

महापालिकेत नगरसेवकांना त्यांच्या मतदारसंघात खर्च करण्यासाठी एक निधी मिळतो. १९९७ ते २००० या काळात नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असताना नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखोंचे क्रीडा साहित्य खरेदी केले. हे करीत असताना कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. अधिकाऱ्यांच्या संगनमताने नगरसेवकांनी बनावट दस्तावेज सादर करून कोटय़वधी रुपये उकळले. त्यानंतर महालेखा परीक्षकांच्या अहवालात महापालिकेत क्रीडा साहित्य खरेदी करताना मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला असून शासनाला ८ कोटींचा फटका बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नागपूर महापालिकेतील क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. या समितीने प्रकरणाची चौकशी करून १०९ नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा ठपका ठेवला.

नंदलाल यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यावेळी कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, कल्पना पांडे आदी भाजपचे दिग्गज नगरसेवक होते. या घोटाळ्यानंतर महापालिकेत सत्ताबदल होऊन काँग्रेसची सत्ता आली होती. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सुभाष घारे आणि अ‍ॅड. उदय डबले यांनी काम पाहिले.

आरोपींनी न्यायालय ‘हाऊसफुल्ल’

पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण बुधवारी आरोप निश्चित करण्यासाठी ठेवण्यात आले होते. प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी.पी. रागीट यांच्यासमक्ष झाली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२० आणि ४६८ अंतर्गत आरोप निश्चित केले आणि १९ सप्टेंबरला साक्षीपुरावे तपासण्यासाठी ठेवले. सुनावणीवेळी न्यायालयात सर्व आरोपी हजर असल्याने न्यायालय कक्ष आरोपींनीच ‘हाऊसफुल्ल’ झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nagpur municipal corporation sports equipment purchase scam

ताज्या बातम्या