नागपूर : नागपूर महापालिकेने शहरात ‘टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी’ प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प देशातील दुसरा ठरणार आहे. पहिला प्रकल्पही राज्यातच असून लवकरच नागपूर महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी पाहणी करणार आहे.

काय आहे प्रकल्प?

शहरात दररोज १२०० टन कचरा निघत असून यात ५०० कपड्यांचा समावेश आहे.या कपड्यांचा पुनर्वापर करण्याबाबत महापालिकेने शहरात ‘टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी’ प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात याशहरात आहे हा प्रकल्प

सध्या देशात नवी मुंबई महापालिकेद्वारे हा प्रकल्प सुरू असून नागपूर देशातील दुसरे शहर ठरणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी या संदर्भात एका उच्चस्तरीय आभासी बैठक झाली. आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा देसाई, मनपा अतिरिक्त आयुक्त अंकित, मुरुगानंथम एम., मिलिंद मेश्राम, उपायुक्त राजेश भगत, डॉ. रंजना लाडे आणि घनकचरा व्यवस्थापक डॉ. गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूरकरांनो, आता जुने कपडे सांभाळा!

येत्या काळात नागपूकरांना आपले कपडे सांभाळून ठेवावे लागणार आहे. महापालिकेचे कचरा संकलन करणारेही आता नागरिकांचे जुने कपडे घेणार नाही. महापालिकेकडून नागरिकांचे जुने कपडे गोळा करण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. हे जुने कपडे चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरणार आहे.

महिला बचत गटांना देणार काम

महिला बचत गटांच्या माध्यमातून नागरिकांकडून हा अनावश्यक कापडी कचरा गोळा केला जाईल आणि त्यावर प्रक्रिया केली जाईल. कापडी कचरा उघड्यावर न टाकण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेने चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि भांडेवाडी डम्पिंग यार्डवरील कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

एकूण जुन्या कपड्यांपैकी ७० टक्के कपड्यांचा पुनर्वापर

शहरातून दररोज सुमारे ५०० टन कपड्यांचा कचरा निघतो. शहरात ८ ते १० एकर जागेवर प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. गोळा होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी ७० टक्के कापड हे पुन्हा वापरण्यायोग्य केले जाईल, तर उर्वरित ३० टक्के कपड्यांपासून नवनवीन उत्पादने तयार केली जातील. सध्या अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण प्रकल्प नवी मुंबई महापालिकेत यशस्वीपणे सुरू आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामकाजाची, तंत्रज्ञानाची आणि व्यवस्थापनाची पाहणी करण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांची एक विशेष टीम पुढच्या आठवड्यात नवी मुंबईला भेट देणार आहे.

रोजगाराच्या नवीन संधी

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील नाल्यांमध्ये कापड येणे पूर्णपणे बंद होईल. या प्रकल्पामुळे शहरात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून, घनकचरा व्यवस्थापनाचे नवीन नियमही कडकपणे अंमलात आणले जाणार आहे. नागरिकांनी जुने, निरुपयोगी कापड कुठे ही टाकू नये, ही योजना अंमलात आल्यानंतर महापालिकेच्या पथकाला द्यावे. – डॉ. विपीन इटनकर, आयुक्त, महापालिका.