नागपूर: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या अभुतपूर्व गोंधळाला भोंडला गीतांमधील मूळ ओळींचे हे विंडबन तंतोतंत लागू पडावे. राज्यातील सर्वच पक्षांनी कोणताही पायपोस न पाळता केलेल्या युती-आघाड्यांनी बंडखोरीला उधाण आले. उमेदवारी मिळवण्यासाठी रात्रभर तिष्ठत राहिलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक, मोडतो, नेत्यांना शिवीगाळ, उमेदवारी अर्जाची पळवापळवी असे सुसंस्कृत राजकारणाला लाजवणारे सर्व प्रकार मंगळवारी एका दिवसात राज्याला दाखवले. मात्र नागपूर महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युती झाल्यानंतर शिंदे मध्ये प्रचंड संताप सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भाजपला तिकीट विकल्याचा आरोप होत आहे. नेमका प्रकार काय आहे ते पाहूया.

महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची भाजपसोबत युती झाली असली तरी शिवसेनेला केवळ आठच जागा देण्यात आल्याने सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांची धंतोली कार्यालयासेमोर राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांच्याविरोधात घोषणा दिल्या. जयस्वाल यांनी भाजपला आठही उमेदवार विकल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार यादीची होळी करण्यात आली.

महायुतीची मोट बांधण्यासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात २८ डिसेंबरला महत्त्वाची बैठक झाली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड चर्चा झाली. या बैठकीत महायुतीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले, असे उदय सामंत यांनी सांगितले होते. त्यानंतरही मात्र, युती अंतिम न झाल्याने बैठकांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत ॲड. आशीष जयस्वाल यांच्या नेतृत्वात बैठक झाली. यावेळी १४३ आणि ८ असे जागांचे सूत्र ठरले. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंत भाजप आणि शिवसेनेने ते जाहीर केले नाही.

अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर भाजपने दुपारी ३.३० वाजता उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये शिवसेनेला आठ जागा दिल्याचे शिक्कामोर्तब झाले असले तरी सेनेच्या जागेवरील असलेल्या आठ पैकी ७ उमेदवार हे भाजपचे असल्याचा आरोप आहे. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष असून त्यांनी धंतोली कार्यालयासमोर मंगळवारी रात्री आंदोलन केले. यावेळी राज्यमंत्री जयस्वाल यांच्यावर विविध आरोप करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभा केलेला पक्ष ते संपवत असल्याचाही आरोप केला. शिंदे यांनी कार्यकर्त्यांची भावना समजून घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.