महिला पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, गडकरींचे आवाहन
पुढच्या वर्षी होणारी महापालिकेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची आहे, हे लक्षात घेऊन भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी आतापासून कामाला सुरुवात करावी व महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाने राबविलेल्या योजना घराघरापर्यंत पोहोचाव्या, हे काम महिला कार्यकर्त्यां चांगल्या पद्धतीने करू शकतात, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर कार्यकारिणीची घोषणा शनिवारी गडकरी यांच्या उपस्थितीत रेशीमबाग येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. त्यावेळी गडकरी बोलत होते. नागपूरमध्ये महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना देशपातळीवर मॉडेल म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत.चोवीस तास पाणी पुरवठा असो किंवा कचऱ्यापासून वीज निर्मिती आणि सांडपाण्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी करणाऱ्या प्रकल्प आदींचा त्यात समावेश आहे. पुढच्या काळात शहरातील अनधिकृत लेआऊट्समध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी जास्तीत जास्त योजना राबविल्या जाणार आहेत. याचा प्रचार आणि प्रसाच महिला कार्यकर्त्यांंनी घरोघरी जाऊन करावा, महापालिकेची पुढची निवडणूक ही पक्षासाठी प्रतिष्ठेची आहे हे डोळ्यापुढे ठेवून आतापासूनच कामाला लागा, असे गडकरी म्हणाले. केंद्र शासनाकडून नागपूर शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला जात आहे. आतापर्यंत राज्याला ११५८ कोटी रुपये देण्यात आले आहे. यापूर्वीच्या सरकारने फक्त ६ हजार कोटी रुपयेच दिले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.दरम्यान, भाजपच्या नागपूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष नंदा जिचकार यांनी यावेळी जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर केली. समाजाच्या प्रत्येक घटकाला या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या व महापालिकेने राबविलेल्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात असे आवाहन गडकरी यांनी केले. प्रास्ताविक नंदा जिचकार यांनी केले. महिला पदाधिकाऱ्यांची पुढच्या काळातील वाटचाल कशी असेल याबाबत त्यांनी विवेचन केले. कार्यक्रमाला माजी महापौर माया ईवनाते, कल्पना पांडे यांच्यासह इतरही महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

गडकरींच्या घोषणा
* सिमेंटच्या रस्त्याखाली कचऱ्याची विल्हेवाट
* डिसेंबर अखेरपर्यत मेट्रोचा पहिला टप्पा
* सीएनजीवर धावणार ५० शहर बसेस
* अनधिकृत लेआऊटचा विकास

बाहेरून आलेल्यांना उमेदवारी नको
निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या महिलांना महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी देऊ नये, त्याऐवजी पक्षात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या महिलांना संधी द्यावी,अशी विनंती महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष नंदा जिचकार यांनी त्यांच्या भाषणातून गडकरी यांना केली.