राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : वनखात्याने इतवारी (नागपूर) ते नागभीड रेल्वेमार्गाच्या कामाला लाल कंदील दाखवल्याने दोन वर्षांपासून काम ठप्प आहे. परिणामी, हा प्रकल्प २० महिन्यात पूर्ण होऊ शकला नाही. आता या प्रकल्पाची किंमत सुमारे तीनशे कोटींनी वाढून १,७०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. ब्रिटिशकालीन इतवारी – नागभीड नॅरोगेज रेल्वेमार्गाचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये केले जाणार आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल) या प्रकल्पाचे काम करीत आहे. रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या संयुक्त वाटय़ातून हा प्रकल्प होत आहे.

राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय खर्चाचा प्रत्येकी ५० टक्के वाटा उचलणार आहे. नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातून जाणारा आणि सर्वात जुना मार्ग आहे. त्याला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यास आधीच खूप विलंब झाला. आता वन्यजीव भ्रमणमार्गामुळे काम अडले आहे. उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पामुळे हा विलंब होत आहे. इतवारी ते नागभीड हा १०६ किलोमीटर नॅरोगेज रेल्वेमार्ग २४ नोव्हेंबर २०१९ ला वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर २० महिन्यात ब्रॉडगेजचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, पण तीन वर्षांनंतर केवळ ४५ टक्केच होऊ शकले. त्यामुळे या प्रकल्पाची मूळ अंदाजित किंमत १४०० कोटींहून वाढून १७०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. यातील १०० कोटी रुपये वन्यजीव उपशमन योजनांवर खर्च केले जाणार आहेत. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ म्हणजे वर्षभरात पूर्ण होईल, असा दावा एमआरआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

या मार्गामुळे पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा जिल्ह्याला लाभ होणार आहे. प्रवासी तसेच मालवाहतुकीत वाढ होईल. एवढेच नव्हे तर नागपूर, कळमना, इतवारी, अजनी आणि वर्धा रेल्वेमार्गावरील वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. या मार्गावरून होणारी कोळशाची वाहतूक इतवारी-नागभीड मार्गावरून होऊ शकेल. परिणामी, कोळसा खाणीपासून वीजनिर्मिती केंद्रापर्यंत कोळसा नेण्याच्या वेळेत बचत होईल. या रेल्वेमार्गाचा फायदा कोराडी, खापरखेडा, एनटीपीसी (मौदा) आणि अदाणी (तिरोडा) औष्णिक प्रकल्पाला होईल.

अंतिम आराखडा सादर

उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे काम थांबले आहे. वन्यजीव उपशमन उपायोजना करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील अंतिम आराखडा महारेल्वेने प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाला (पीसीसीएफ) सादर केला आहे. येत्या महिनाभरात त्यास मान्यता मिळणे अपेक्षित आहे. 

– डी.आर. टेंभुर्णे, समूह महाव्यवस्थापक, एमआरआयडीसी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur nagbhid railway project cost at 1700 crores work halted wildlife trails nagpur news ysh
First published on: 10-12-2022 at 00:02 IST