नागपूर : शहरातील नंदनवन परिसरात एका उच्चशिक्षित तरुणीने आणि तिच्या शिक्षिका असलेल्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, माय– लेकींच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये आकांक्षा ब्रह्मे ( २९) आणि तिची आई संगीता ढबाले ( ५२) यांचा समावेश आहे. दोघीही नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहात होत्या. शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरात दोघींचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षाचे दोन वर्षांपूर्वी एका अभियंता तरुणाशी लग्न झाले होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ती मानसिकदृष्ट्या खचली होती. अशा परिस्थितीत सासरच्या मंडळींकडून तिला अपेक्षित आधार मिळाला नाही. उलट, बाळाच्या मृत्यूसाठी तिलाच जबाबदार धरत तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या त्रासामुळे आकांक्षा काही काळापासून आईकडे राहत होती.
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी दोन स्वतंत्र सुसाईड नोट आढळून आल्या आहेत. या प्रकरणी नातेवाईकांनी मालमत्तेचा वाद आणि सातत्याने होणाऱ्या मानसिक छळाचे गंभीर आरोप सासरच्या मंडळींवर केले आहेत. नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सुसाईड नोट आणि नातेवाईकांचे जबाब यांच्या आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक तणाव आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
सुसाईड नोट मध्ये काय ?
आई संगीता ढबाले यांनी आपल्या चिठ्ठीत स्वेच्छेने हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. तर आकांक्षाने लिहिलेल्या चिठ्ठीत, “माझा मृतदेह सासरच्या ताब्यात देऊ नका आणि अंत्यसंस्कार वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणीच करा,” अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे.
घटनेच्या आदल्या दिवशी पती- पत्नीमध्ये वाद…
घटनेच्या आदल्या रात्री आकांक्षाचा पती लोकेश हा घरी आला होता. त्या वेळी दोघांमध्ये तीव्र वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर रात्री उशिरा माय–लेकींनी घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेचा उलगडा कसा झाला ?
शुक्रवारी सकाळी आकांक्षा फोन उचलत नसल्याने पती पुन्हा घरी आला असता, खिडकीतून त्याला दोघींचे मृतदेह दिसले आणि हा प्रकार उघडकीस आला.
