नागपूर : नवजात बाळाच्या निधनामुळे माहेरी आरामाला आलेली विवाहित लेक आणि शिक्षिका असलेल्या आईने महाराष्ट्र दिनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने नंदनवन परिसर हादरला आहे. या दोघींनी आत्महत्येपूर्वी मागे सोडलेल्या चिठ्ठीतील मजकूर वाचून पोलीसांचे काळीजही शहारले आहे.
संगीता ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (विवाहित मुलगी) अशी एकाच घरात, एकाच खोलीत शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. संगिता या व्यवसायाने शिक्षिका होत्या.या दोघी नंदनवन परिसरात व्यंकटेशनगर येथे राहत होत्या. या दोघींनी घरातल्या एकाच खोलीत गळफास लावून जीवनाचा शेवट केला.सुशिक्षित, सधन घरात कौटुंबिक वाद आणि तीव्र मानसिक तणावातून या दोघींनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा ब्रम्हे हिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बाळंतपणानंतर तिच्या तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने आकांक्षा तणावाखाली होती. त्यामुळे माहेरी आराम करण्यासाठी ती आईकडे आली होती.दरम्यान काही दिवसांपूर्वी आकांक्षाचे वडील आणि संगिता यांचे पती श्रीराम ढबाले यांचे निधन झाले. त्यामुळे संगिता यादेखील एकांतवासामुळे तणावात होत्या.
माहेरी आईकडे आरामाला आलेली आकांक्षा आणखी एका घटनेमुळे तणावात होती. तिचा पती लोकेश ब्रम्हे हा शेती, घर आणि इतर मालमत्तेच्या वाटणीसाठी पत्नी व सासूसोबत सातत्याने वाद घालत होता. घटनेच्या दिवशी 30 एप्रिलच्या रात्री पती लोकेशने घरी येऊन पुन्हा वाद घातला होता. आई आणि लेक या दोघीही या प्रकाराने अस्वस्थ झाल्या होत्या.त्यामुळेच या मायलेकींनी जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
माहिती मिळताच घटनास्थळी पोचललेल्या पोलिसांना आत्महत्येपूर्वी दोघींनी लिहिलेली पत्रे सापडली. त्यातला मजकूर वाचून पोलीस देखील चक्रावले आहेत.
अंबाळा तलावात वडिलांजवळ विसर्जित करा राख…
आकांक्षाने आत्महत्येपूर्वी जे पत्र लिहिले त्यातल मजकूर वाचल्यानंतर कोणालाही गहिवरून येईल. नवजात बाळाचा झालेला मृत्यू, वडिलांचे निधन आणि त्यात पतिकडून संपत्तीसाठी होणारा त्रास असा तिहेरी ताण सोसत असलेल्या आकांक्षाने मृत्यूला जवळ करण्यापूर्वी काही बाबींचा उलगडा केला. तिने आपले अंत्यसंस्कार वडिलांच्या गावी करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली. मृतदेह कोणत्याही परिस्थितीत सासरच्या लोकांकडे सोपवू नका. ज्या ठिकाणी वडिलांची राख विसर्जित केली त्या अंबाळा तलावात माझी रक्षा देखील विसर्जित करा, असा स्पष्ट उल्लेख आकांक्षाने चिठ्ठीत केला आहे. ज्या ठिकाणी आकांक्षाने मृत्यूला कवटाळले त्याच खोलीत आकांक्षाने आई संगिता यांनी देखील एक चिठ्ठी लिहिली. यात त्यांनी आपण स्वतः हा निर्णय घेतला असून त्याला कोणालाही जबाबदार धरू नका… माझी आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही… असे त्यांनी लिहून ठेवले.
पोलिसांनी दोन्ही चिठ्ठ्या ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, पती लोकेश ब्रम्हे याने मायलेकींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात असून, या धक्कादायक घटनेमागचे नेमके वास्तव आणि कायदेशीर पुरावे शोधण्यासाठी पोलिस आता सखोल तपास करत आहेत.
