नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर नागपूर–नांदेड–नागपूर ही विमानसेवा ३१ मार्चपासून सुरू होणार असून ‘उडान’ योजनेअंतर्गत ही सेवा स्टार एअरकडून चालविण्यात येणार आहे. या सेवेमुळे नागपूरकरांसह नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाऱ्याला भेट देणाऱ्या शीख भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या विमानसेवेचे नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंहजी विमानतळावर ३१ मार्च रोजी स्वागत करण्यात येणार असून माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या नव्या सेवेमुळे नागपूर आणि नांदेड या दोन महत्त्वाच्या शहरांमधील हवाई संपर्क पुन्हा प्रस्थापित होणार आहे.
असे असेल वेळापत्रक
स्टार एअरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आठवड्यातील शुक्रवार वगळता इतर सर्व दिवशी ही सेवा उपलब्ध राहणार आहे. नांदेडहून नागपूरकडे येणारे विमान सकाळी ११.२० वाजता उड्डाण घेऊन दुपारी १२.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. त्यानंतर नागपूरहून नांदेडकडे जाणारे विमान दुपारी १२.४० वाजता उड्डाण घेऊन दुपारी १.३० वाजता नांदेड येथे दाखल होईल. या मार्गावर ८८ आसनक्षमतेचे केवळ इकॉनॉमी वर्ग असलेले विमान वापरण्यात येणार आहे. तिकीट दर सुमारे २,३२६ रुपयांपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोवा-मोपा येथे जाणार
नांदेड येथे पोहोचल्यानंतर हेच विमान पुढे गोवा-मोपा येथे जाणार आहे. त्यामुळे या सेवेमुळे नागपूर, नांदेड आणि गोवा यांच्यातील हवाई संपर्कालाही चालना मिळणार आहे.दरम्यान, स्टार एअरने नागपूर–किशनगड (अजमेर) या मार्गावरील सेवेतही बदल करत ती सेवा पुढे पुण्यापर्यंत वाढवली आहे. त्यामुळे नागपूरमधील प्रवाशांना किशनगड मार्गे पुण्याला जाण्याचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला आहे.
काही सेवा स्थगित
यापूर्वी नागपूरहून नाशिक, कोल्हापूर आणि औरंगाबादसाठी प्रादेशिक विमानसेवा सुरू करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. तसेच नागपूरहून दोहा आणि शारजा या आंतरराष्ट्रीय विमानसेवांचाही प्रारंभ करण्यात आला होता. मात्र इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे या दोन्ही सेवा सध्या स्थगित असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूरहून सुरू असलेल्या सेवा
सध्या नागपूरहून दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद आणि पुणे या प्रमुख शहरांसाठी दररोज विमानसेवा उपलब्ध आहे. नागपूर–नांदेड ही नवी सेवा सुरू झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा यांच्यातील हवाई संपर्क अधिक मजबूत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
