नागपूर : संत्री तोडण्यासाठी गणेशपूरवरून बेलोना कडे मजूर घेऊन जाणारे पिकअप वाहन उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात २६ मजूर जखमी झाले. यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गणेशपूरवरून हे मजूर बगीच्यातील संत्री

तोडण्यासाठी बेलोनाकडे जात होते. मोवाड जवळ भरधाव वेगात निघालेल्या पिकअप वाहन चालकाचे सकाळी साडेदहाच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन उलटले. यात दाटीवाटीने बसलेले २६ मजूर एकमेकांच्या अंगावर पडले.

जखमींमध्ये ९ महिलांचा समावेश

जखमी मजुरांपैकी ९ महिलांचा समावेश आहे. तर १७ पुरुषांचा समावेश आहे. यातील बहुतांश मजूर हे अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील रहिवासी आहेत. जखमींपैकी काही जणांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांची प्रकृती पाहता तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जखमींची नावे

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींमध्ये इंदु नितीन फाटे (३७), बबीता मनीराम चंगरी (३२), सरीता सत्तुलाल परतेती (२५) शर्मीला बळगू कुमरे ( १८), सरस्वती कुमरे ( २४), फुलवंती जीवन सरयाम (६०), बाली उर्फ सवीता जोहरी कुमरे ( ३५), शारदा शेशराव कुमरे (१६), मंगुबाई गणेष उइके ( ५०) या महिलांचा समावेश आहे. तर मजुरांना घेऊन निघालेले पिकअप वाहन उलटल्याने मनोज निळकंठराव दवंडे (३५) रा. रा. इसमरी ता. वरूड जि. अमरावती, अनिकेत उर्फ विजय बाबाराव दवंडे (२४), हेमराज राजारामजी कुमरे (३५), सुनिल काशीरामजी ईवनाती (४५), सुलाप सिताराम मसराम (३३) रा. सोनपठार, सुशील मनिराम सरयाम (१८) रा . वरूड, फागुलाल चंदन सरयाम (४०), राकेश केशवरावजी ईवनाती (३७), चिंटु तेरमु भोरसुंडा (३५) , राहुल जीवन सरयाम (१७) , मंगलु जीवन सरयाम (२०), विनोद सुभाष कुळसंगे (३५), सामबती सनीराम सरयाम ( ६०), विजय अरूण निस्वादे ( २४), शंकर चैतराम मरसकोल्हे (४०), संजय बळगु कुंभारे (२०), तांगदेव हे देखील जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच नरखेड पोलिसांनी अपघातस्थळाकडे धाव घेत जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

एमकेकांच्या अंगावर पडले मजूर

संत्रातोडण्यासाठी हे मजूर सकाळीच शेतात निघाले होते. त्याच वेळी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने त्यांचे पिकअप वाहन गणेशपूर- बेलोना मार्गावर सकाळी साडेदहाच्या सुमारास उलटले. मजूर वाहनात दाटीवाटीने बसल्याने अचानक वाहन उलटल्याने हे मजूर एकमेकांच्या अंगावर पडले. यात पिकअप वाहनाचे लोखंडी आणि लाकडी पाटे लागल्याने मजुरांना दुखापती झाल्या. परिसरातील नागिरकांनी धाव घेत उलटलेले पिकअप वाहन सरळ करत जखमी मजुरांना बाहेर काढले.