नागपूर : कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवेत मोठा बदल होणार आहे. सामान्य तसेच अतिदक्ष रुग्णांची संपूर्ण वैद्यकीय माहिती डॉक्टरांना एका क्लिकवर उपलब्ध होणार असून, रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे येणाऱ्या रुग्णाच्या प्रकृतीवरही डॉक्टरांना थेट लक्ष ठेवता येणार आहे. एवढेच नव्हे, तर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उपचार प्रक्रिया सुरू करणेही शक्य होणार आहे. नागपुरातील न्यू एरा रुग्णालयात हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद सांचेती यांनी दिली.

न्यू एरा रुग्णालयाची नवीन शाखा कधी सुरू होणार?

रामदासपेठ येथील न्यू एरा रुग्णालयाच्या नवीन शाखेचे उद्घाटन २६ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. आनंद सांचेती यांनी नव्या रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधांची माहिती दिली. यावेळी रुग्णालयाचे संचालक डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. निधीश मिश्रा तसेच इतर संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रुग्णांसाठी एआय तंत्रज्ञानाचा नेमका उपयोग काय होणार?

रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाची नोंदणी, तपासण्या, निदान, उपचार, औषधोपचार आणि वैद्यकीय इतिहासाची संपूर्ण माहिती संगणकीय प्रणालीमध्ये नोंदविली जाणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता या माहितीचे विश्लेषण करून डॉक्टरांना रुग्णाच्या आजाराचे अधिक अचूक निदान आणि योग्य उपचार करण्यास मदत करणार आहे.

रुग्णवाहिकेतूनच उपचार कसे शक्य होणार?

रुग्णालयाच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकांमध्ये आवश्यक वैद्यकीय उपकरणांसह कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणाली बसविण्यात येणार आहे. नागपूर किंवा जिल्ह्याबाहेरील कोणत्याही भागातून रुग्ण आणताना त्याची प्रकृती, तपासणीचे अहवाल आणि आवश्यक माहिती थेट रुग्णालयातील डॉक्टरांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे डॉक्टर रुग्णाची स्थिती सतत पाहू शकतील. आवश्यक असल्यास रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उपचार सुरू करण्याबाबत सूचना देता येणार आहेत.

रुग्णालयात आणखी कोणत्या सुविधा असतील?

रामदासपेठ येथील नवीन रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असेल. येथे विविध शाखांतील तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची सेवा उपलब्ध राहणार आहे. तसेच राष्ट्रीय रुग्णालय मानांकन मंडळाचे (एनएबीएच) मानांकन मिळविण्यासह विविध अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ. आनंद सांचेती यांनी दिली.

रुग्णालयातील कामकाजात काय बदल होणार?

रुग्णालयातील सर्व कामकाज टप्प्याटप्प्याने कागदविरहित करण्यात येणार आहे. त्यामुळे उपचार प्रक्रियेत वेग, अचूकता आणि पारदर्शकता वाढेल. डॉक्टरांना रुग्णाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने निर्णय घेणे अधिक सोपे आणि जलद होणार असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला.