नागपूर : विशिष्ट धर्माच्या चालीरितींचे पालन करण्यासाठी दबाव आणत कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी तरुणींना धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार स्वयंसेवी संस्थेत चव्हाट्यावर आला. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. राज्यात ‘टीसीएस’सारख्या आयटी कंपनीत धर्माच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार गाजत असतानाच उपराजधानीत घडलेल्या या घटनेने संताप व्यक्त होत आहे.
मानकापूर पोलीस हद्दीत ही घटना चव्हाट्यावर आली. या प्रकरणातील आरोपी हा एका स्वयंसेवी संस्थेचा संचालक आहे. धार्मिक कारणावरून त्याच्या दबावाला बळी न पडलेल्या महिला कर्मचाऱ्याचा त्याने विनयभंग देखील केला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या प्रकारानंतर महिला कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रारही केली होती.
विशिष्ट धर्मच्या चालीरितींचे पालन करण्यास नकार देल्यानंतर त्याने धमकी दिल्याचे तरुणींनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात पोलिसांनी स्वयंसेवी संस्थेचा संचालक रियाझ काझी याला अटक केली आहे.
नेमके प्रकरण काय?
रियाझ काझी हा फिकर फाऊंडेशन आणि पढे हम पढाए हम या नावांनी स्वयंसेवी संस्था चालवतो. त्याच्या संस्थेत काही कर्मचारी कामाला असून त्यात काही तरुणींचादेखील समावेश आहे. जुलै २०२४ मध्ये त्याने एनजीओमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला होता. तरुणीने त्याला समज दिली होती. मात्र तरीदेखील तो वारंवार तिची छेड काढत होता. दरम्यान, कार्यालयातील तरुणींना तो वारंवार आपण पालन करत असलेल्या धर्माशी निगडीत चालीरितींची माहिती देत होता. त्यानुसार आचरण करण्याचा दबावही टाकत होता. त्याच्या वागण्याला कंटाळून काही तरुणींनी नोकरी सोडली. काही दिवसांपूर्वी रियाझने नोकरी सोडून गेलेल्या तरुणीच्या आईला फोन केला. त्याने तुमची मुलगी कशा रितीने वागते याविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. हा प्रकार कळताच तरुणी एकत्रित आल्या व थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.
आरोपीविरोधात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेत चौकशीला सुरुवात केली. तेव्हा रियाझ काझीने धार्मिक चालीरितींचे पालन करण्यासाठी दबाव टाकल्याची बाब प्राथमिक तपासातून समोर आली. पोलिसांनी रियाझ काझीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला रात्रीच अटक केली. त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यासंदर्भात मानकापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हरीश काळसेकर यांना विचारणा केली असता त्यांनी रियाझ काझीच्या अटकेला दुजोरा दिला.
चार तरुणींचा मानसिक छळ
रियाझ काझी बऱ्याच कालावधीपासून त्याच्याकडे काम करणाऱ्या तरुणींचा मानसिक छळ करत होता. त्याच्या गोष्टींना दाद न देणाऱ्या तरुणींना त्याने नोकरीवरून काढून टाकण्याची व चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची धमकीदेखील दिली होती. त्याने कुटुंबियांनादेखील धमकी दिल्याचे तरुणांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. त्याच्या या कृत्यात रियाझसोबत आणखी कुणी सहभागी आहे, का याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच त्याने इतरही कोणत्या तरुणींवर अशा प्रकारे दबाव आणला होता का या दिशेनेदेखील चौकशी केली जात आहे.
