नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नंतर महाराष्ट्र भाजपमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तीन वर्षाच्या या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षपदाचा पदभार सोहळा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि ऑटो रिक्षा चालकांचा संबंध काय? यावर एक अनोखा किस्सा सांगितला. तो काय आहे पाहूया…
गडकरी म्हणाले, भाजपा हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कोणाचे वडील आई आमदार खासदार नसतानाही एक सामान्य घरातील व्यक्ती प्रदेशाध्यक्ष बनू शकतो. ही ताकद केवळ भाजपा मध्ये आहे. यावेळी गडकरी म्हणाले की, रविंद्र चव्हाण पहिल्यांदा निवडणुकीत उभे राहणार असताना, त्यांच्या उमेदवारी संदर्भात अडचण निर्माण झाली होती. यावेळी मी मुंबईला आलो असताना ते ऑटो रिक्षा चालक संघटनेचे प्रमुख होते. त्यांनी माझ्या आगमनानिमित्त ऑटो रिक्षा चालकांचा मोठा मोर्चाही काढला होता. तर मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा भाजपामध्ये आले असताना ऑटो रिक्षा चालक होते. त्यामुळे भाजपाचा ऑटोरिक्षा चालकांची संबंध काय असं गडकरी म्हणतात सभागृहात एकच हसा पिकला होता.
चंद्रशेखर बावनकुळेंचे भावनिक पत्र
अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर बावनकुळे यांनी जनता आणि कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहले आहे. यात प्रदेशाध्यक्ष असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आलेले अनुभव कथन केले. तसेच लोकसभा निवडणुकीत काहीसे अपयश आल्यामुळे ते पुन्हा त्यातून कसे सावरले याबद्दलही माहिती दिली आहे. बावनकुळेंच्या पत्रात काय आहे पाहूया..
साधारण ३५ वर्षांपूर्वी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्याच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भिंती रंगवणे, पत्रके वाटणे, गावोगाव कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर, तर पायीच प्रवास करणे इथपासून सुरू झालेला माझा प्रवास भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहोचला; हे माझ्यासाठीच अविश्वसनीय आहे. खरोखरच मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, कधीतरी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आपण काम करू असेही ते म्हणाले.