नागपूर : लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. आता जवळपास कुठलीही निवडणूक नाही. त्यामुळे सत्ताधारी मालमत्ता करात वाढ करून खिशात हात घालतील, अशी भीती नागपूरकरांना होती. परंतु कुठल्याही करात वाढ न करता स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी नागपूरकरांना दिलासा दिला. उत्पन्नासाठी वेगळ्या मार्गाचा विचार करीत त्यांनी अर्थसंकल्पातून विकासातही खंड पडणार नाही, याबाबत काळजी घेतली.
केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून विकासाचा मार्ग
महापालिकेच्या स्थायी समितीचा अर्थसंकल्प सभापती शिवानी दाणी यांनी शनिवारी सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या सभेत महापौर निता ठाकरे यांच्याकडे सादर केला. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ६२०२.४८ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारी महापालिका सभागृहात सादर केला. २०२१ नंतर सत्ताधाऱ्यांकडून सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानावरच मदार असून शहराच्या विकास कामात खंड पडणार नाही, असा दावाही शिवानी दाणी यांनी केला. महिला सक्षमीकरण, अपंग, ज्येष्ठ नागरिक, जेन-झीसाठी विविध योजनांसह सिमेंट रस्त्यांचा पाचवा टप्पा, अमृत योजना २.०, ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प, नाग नदी, पोहरा नदी प्रदूषण निर्मुलन प्रकल्प येत्या वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
नगरसेवकांनाही दिलासा, विकास निधीत केली एवढी वाढ
स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी यांनी प्रभागामध्ये विकास कामावर खर्च करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला २५ लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली. यापूर्वी प्रभाग निधी केवळ २० लाख रुपये होता.
महापालिका निवडणुकीतील जाहिरनाम्यात आश्वासन दिलेल्या अनेक बाबींचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे त्यांनी नमुद केले. त्याचवेळी महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ता कर वसुलीत वाढीवर भर देण्यात आला आहे. १०० कर संकलन कर्मचाऱ्यांना पॉस मशीन देण्यात येईल. ते घरोघरी जाऊन कर वसुली करणार आहे. याशिवाय नगरसेवकांच्या कार्यालयांमध्येही उपलब्ध करून देण्यात येईल, असे दाणी यांनी नमुद केले. महापालिकेचा नगर रचना विभाग व राज्य सरकारच्या महसूल विभागाची प्रणालीचे एकत्रीकरण करून भूखंड, घर खरेदी विक्रीची माहिती मिळवून थेट कर संकलन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात २०१५ मध्ये १००० किमीचे भूमिगत फायबर ऑप्टीकचे जाळे टाकण्यात आले आहे. नव्या डक्टिंग धोरणानुसार केबलधारकांना ते भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे दाणी यांनी सांगितले. जेन झीसाठी स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरण व सुविधांवर भर
महापालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षात महिलांसाठी ४ कोटींमध्ये ७५ स्मार्ट शौचालये तयार करण्यात येणार आहे. बचत गटातील महिलांसाठी व्यापारी संकुलनिर्मिती तसेच रोजगार, प्रशिक्षणासाठी ३५.२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापौर माहेर योजनेतून लग्नानंतर शहराबाहेर गेलेल्या कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान तसेच महापौर महिला स्वावलंबन योजनेतून उद्योजिकांसाठी स्थायी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्पांमध्ये कर्मचारी महिलांसाठी वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
नागपूरला पर्यटनस्थळ म्हणून विकासाचा संकल्प
शहराला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा संकल्प शिवानी दाणी यांनी व्यक्त केला. शहरातील उद्यानांची नवनिर्मितीसह क्यूआर कोड स्कॅन करून दृकश्राव्य माध्यमातून चौकांचा इतिहास सांगणे, दरवर्षी शहरातील प्रसिद्ध सावजी भोजनासाठी ७ दिवसीय सावजी महोत्सव, मारबत महोत्सवाची जागतिक स्तरावर प्रसिद्धी, राज्य मत्स्य विभागाच्या सहकार्याने आकर्षक जागतिक दर्जाचे मत्सालय उभारण्यात येणार असल्याचे दाणी यांनी नमुद केले.
सर्वसामान्य जनतेला न्याय देताना त्यांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय शहराचा गौरव राखण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. – निता ठाकरे, महापौर.
प्रभाग निधी २० लाख होता. त्यात केवळ पाच लाखांची वाढ करण्यात आली. प्रभाग निधीतून नागरिकांच्या सुविधांची किरकोळ कामे केली जाते. त्यामुळे यात आणखी वाढ अपेक्षित होती. – संजय महाकाळकर, विरोधी पक्षनेते.
