नागपूर : काँग्रेसने विभागीय कार्यालयांमध्ये गट नोंदणी केली. मुस्लीम लीग व ‘एमआयएम’नेही वेगवेगळी गट नोंदणी केली आहे. मात्र, महापालिकेत भाजपविरोधात काँग्रेस, मुस्लीम लीग, ‘एमआयएम’ची आघाडी होण्याची शक्यता बळावली आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनीच याबाबत गट नोंदणीनंतर संकेत दिले. विशेष म्हणजे, या तिन्ही पक्षांनी वेगवेगळी नोंदणी केली असली तरी तिन्ही पक्षाच्या आघाडीचीही गट नोंदणी करणे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांनीही नमूद केले.
काँग्रेसने ‘नागपूर महाविकास आघाडी’ नावाने विभागीय कार्यालयात नोंदणी केली. नोंदणी केल्यानंतर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. भविष्यात आघाडी करता येईल, असेही ते म्हणाले. तिन्ही पक्षांनी आघाडी केल्यास स्थायी समितीमध्ये वाढीव सदस्य तसेच स्वीकृत सदस्यांची एकने विरोधकांकडे संख्या वाढू शकते. त्यामुळे ही आघाडी होण्याची शक्यता बळावली आहे. महापालिकेत काँग्रेसचे ३४ तर एमआयएमचे ६, मुस्लीम लीगचे ४ व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन सदस्य आहेत.
आशीनगर झोनमध्ये सभापतींचाही तिढा सुटणार
आशीनगर झोनमध्ये मुस्लीम लीग ४, एमआयएम ३ असे ७ सदस्य आहेत तर काँग्रेसचे ७ सदस्य आहेत. भाजप व बसपचा प्रत्येक एक सदस्य आहे. बसप येथे काँग्रेसकडे गेल्यास काँग्रेसचा सभापती होईल, मुस्लीम लीग व एमआयएम एकत्र येऊन बसपकडे पाठिंबा मागितल्यास त्यांचा सभापती होऊ शकते. परंतु, आघाडी झाल्यास एक एक वर्ष काँग्रेस, एमआयएम व मुस्लीम लीगचा सभापती करून तोडगा काढता येईल, असे एका नगरसेवकाने सांगितले.
भाजपमध्ये अस्वस्थता, गट नोंदणीही नाही
स्पष्ट बहुमत असताना मतमोजणीच्या चौदा दिवसानंतरही महापौरपदाचा तिढा सुटला नसल्याने भाजपमधील नवनिर्वाचित नगरसेवकांत अस्वस्थता दिसून येत आहे. एकीककडे महापालिकेतील महापौरांच्या कक्षाची रंगरंगोटी पूर्ण झाली असून खुर्ची, त्यापुढे अभ्यागतांसाठीही आसने लावण्यात आली आहे. परंतु महापौरपदाच्या निवडणुकीची साधी चाहूलही नसल्याने नगरसेवकांसोबत प्रशासनातही संभ्रमाचे वातावरण आहे. राजपत्रात नगरसेवकांची नावे घोषित झाल्यापासून ३० दिवसांत गट नोंदणी करता येत असल्याने भाजपही सुस्त झाल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे.
महापौरपदच नव्हे तर उपमहापौर, स्थायी समिती, स्वीकृत सदस्यांबाबत ज्येष्ठ नेते दररोज एकमेकांशी चर्चा करीत आहे. भाजपमधील धोरणात्मक निर्णयातील प्रत्येक नेता तसेच काही नगरसेवकांसोबत महापौरपदाची निवडणूक, स्थायी समिती, स्वीकृत सदस्याच्या नियुक्तीबाबत आपली मते व्यक्त करीत आहे.

