नागपूर : महापालिका निवडणुकीमुळे मागील वर्षीच्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात मालमत्ता करात ६३ लाख रुपयांची घट आल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. मागील वर्षी अर्थात २०२५ मध्ये जानेवारीच्या १६ तारखेपर्यंत ७३ लाख ३२ हजार ७७८ रुपयांची वसुली झाली. यावर्षी १६ जानेवारीपर्यंत १० लाख ३२ हजार ६८४ रुपयांपर्यंतच वसुली होऊ शकली. १६ जानेवारीपर्यंत महापालिका निवडणुकीची धामधूम होती, हे विशेष. या १५ दिवसात फक्त १४ टक्के वसुली झाल्याने आता मार्चपर्यंत लक्ष्य गाठण्याचे मोठं आव्हान महापालिकेपुढे आहे.

जकात, एलबीटी बंद झाल्यानंतर मालमत्ता कर महापालिकेच्या अर्थकारणाचा कणा आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन मालमत्ता कराच्या वसुलीवर अवलंबून आहे. मात्र अनेकदा कर विभागातील कर्मचाऱ्यांवरच प्रयोग केले जात असल्याची बाब वेळोवेळी पुढे आली. त्याचा फटकाही अनेकदा महापालिकेच्या तिजोरीला बसला आहे. नुकतीच महापालिकेची निवडणूक पार पडली. या प्रक्रियेत महापालिकेच्या सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी होते. याचा सर्वाधिक फटका मालमत्ता कर विभागाला बसला.

मागील वर्षी १६ जानेवारीपर्यंत महापालिकेच्या कर विभागाने ७३ लाख ३२ हजार ७७८ रुपये वसूल केले होते. त्या तुलनेत यंदा केवळ १४.१ टक्के वसुलीत यश आले. मागील वर्षी सर्वाधिक १० लाख १ हजार ५५ रुपये वसूल करणाऱ्या मंगळवारी झोनमध्ये यंदा १६ जानेवारीपर्यंत केवळ १ लाख ८० हजार ५७१ रुपये वसूल झाले. मागील वर्षी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ९८९ मालमत्तांवरील कर वसूल झाला होता तर यावर्षी केवळ १३५ मालमत्तांचा कर वसूल करण्यात आला.

१ टक्क्यांपेक्षाही कमी वसुली

सतरंजीपुरा झोनमध्ये मागील वर्षी ३ लाख १ हजार ९२ रुपयांची वसुली झाली होती. यंदा केवळ २ हजार ९४२ रुपये वसूल करण्यात आले. ही वसुली १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. धंतोली झोनमध्ये १ लाख १२ हजार २०३ रुपये वसूल करण्यात आले, यंदा ४ हजार ४१६ रुपये वसूल झाले. ही वसुली केवळ ४ टक्के आहे. मागच्या वर्षी येथे ६७ हजारांची थकीत वसुली करण्यात आली होती. यंदा १६ जानेवारीपर्यंत एक रुपयाही वसुली झाली नाही.

अडीच महिन्यांत २३० कोटी वसुलीचे आव्हान

२०२५-२६ या वर्षात मालमत्ता करातून ४०० कोटींचे लक्ष्य आहे. पहिल्या सहामाहीत अर्थात ऑक्टोबरपर्यंत कर विभागाने १३० कोटी रुपयांची वसुली केली होती. आता १६ जानेवारीपर्यंत १७० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. त्यामुळे जानेवारीचे पंधरा दिवस, फेब्रुवारी व मार्च असे अडीच महिने शिल्लक असून या काळात २३० कोटींचे लक्ष्य गाठण्याचे आव्हान आहे.