नागपूर : आय आय एम, ट्रीपल आयटी, सिम्बॉयसिस, नॅशनल लॉ स्कूल, नॅशनल फॉरेन्सिक युनिवर्सिटी पाठोपाठ आता नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची ॲग्री बिझनेस स्कूल होतेय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामी पुढाकार घतला आहे.”विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळावी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानामध्ये तरुणांना प्रशिक्षित करून सक्षम करणे हे ॲग्रोव्हिजन चे ध्येय असून, याच माध्यमातून नागपुरात ‘ॲग्रोव्हिजन ग्लोबल ॲग्री बिझनेस स्कूल’ सुरू करण्याचा प्रयत्न आहे असे गडकरी यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या तयारीसाठी स्पेनमधील एक उच्चस्तरीय तज्ज्ञ शिष्टमंडळ शुक्रवारी विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते, या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते. विदर्भातील संत्रा व फलोत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन वाढवण्यासाठी नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने स्पेन येथील डेव्हीस मॉरेनो, फ्रांसिस्को जॅव्हियर आणि जॉन अँटीनिओ या तज्ज्ञांनी संत्रा उत्पादक क्षेत्रांचा दौरा करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

शेतकऱ्यांच्या गरजा, अडचणी आणि संधी यांचा त्यांनी अभ्यास केला. दौऱ्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲग्री बिझनेस स्कूल सुरू करण्यास सहमती दर्शविली. नितीन गडकरी यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा करताना सांगितले की, “विदर्भातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन आणि गुणवत्तेत लक्षणीय वाढ होऊ शकते. यासाठी जागतिक स्तरावरचे तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योगातील कौशल्ये आणि निर्यात केंद्रित दृष्टीकोन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले, “शेती ही एक फायदेशीर व्यवसायिक प्रक्रिया होऊ शकते, फक्त त्यासाठी योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ॲग्रोव्हिजन ॲग्री बिझनेस स्कूल हे या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. विदर्भातील तरुणांना जागतिक कृषी नवकल्पनांची माहिती मिळावी, त्यांना स्टार्टअप्स व निर्यातीसाठी मार्गदर्शन व्हावे, हा आमचा उद्देश आहे.” याप्रसंगी ॲग्रोव्हिजन फाउंडेशनमार्फत भारत व स्पेनमधील कृषी तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. या प्रयत्नांतून विदर्भातील शेतकरी व तरुणांना कृषी क्षेत्रात नवसंधी उपलब्ध होणार आहेत.