नागपूर : देशाची राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्टेशन लगत झालेल्या सोमवारी सायंकाळी झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याची उपराजधानी नागपूरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल आणि रेशीमबाग येथे प्रत्येक हालचालींवर बारिक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

नवी दिल्लीत सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास कारमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आयुक्तालयातून सर्व संवेदनशील स्थळांना अलर्ट जारी करण्यात आला. महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर, सिव्हिल लाईन येथील उच्च न्यायालयाची इमारत, विधानभवन, डॉ. बाबासाबेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत अतिसंवेदनशील झोनमध्ये आहे.

त्यामुळे दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांना तातडीने अलर्ट जारी करण्यात आला. संवेदनशील परिसरात प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सुचनाही बिनतारी संदेश यंत्रणेवरून देण्यात आल्या.

महाल येथील संघ मुख्यालय परिसरात सुरक्षेसाठी सध्या ३ पोलीस अधिकारी आणि पोलीस दलासह राज्य राखीव दलाच्या ७९ जवान २४ तास तैनात आहेत. या खेरीज रेशिमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिरात ही विद्यमान स्थितीत राज्य राखीव पोलिस दलाचे १०० जवान २४ तास तैनात आहे.

महाल आणि रेशिमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन मुख्य इमारती आहेत. महाल येथील संघ मुख्यालयात ७ जणांचे शीघ्र प्रतिसाद दलालाही अलर्ट जारी झाला आहे. या खेरीज दोन्ही ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाची प्रत्येकी ३० सदस्यांच्या दोन प्लाटून तैनात आहेत. पेट्रोलिंग वाढवून गर्दीच्या आठ ठिकाणी पेट्रोलिंग वाहनांना सतर्कतेचे आदेश दिले आहे. -राहूल मदने, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन