नागपूर : अवघ्या १२ वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांची चिमुकली मुलगी. त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आधार असलेली आई एका अपघाताने हिरावून घेतली. ज्या आईच्या कुशीत दोघांना सुरक्षिततेची जाणीव व्हायची, तीच आई पुन्हा कधीच परतणार नव्हती. मात्र, या दुःखद प्रसंगात कुटुंबाने घेतलेल्या एका निर्णयामुळे तीन रुग्णांना नव्याने जगण्याची संधी मिळाली. मेंदूचे कार्य पूर्णपणे थांबल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कुटुंबाने ४१ वर्षीय मनीषा बडगे यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यातून यकृत आणि दोन किडन्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले.

नेमका अपघात कसा झाला?

मनीषा बडगे या १७ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने अमरावती येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावत गेली. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मेंदूचे कार्य पूर्णपणे थांबल्याचे (ब्रेन स्टेम डेथ) समितीने घोषित केले.

मग कुटुंबाने काय निर्णय घेतला?

मनीषा यांचे पती सागर बडगे (४१) आणि कुटुंबीयांसमोर हा अत्यंत कठीण प्रसंग होता. दोन लहान मुलांच्या आईला गमावण्याचे दुःख असतानाही त्यांच्या अवयवांमुळे इतरांचे आयुष्य वाचू शकते, ही जाणीव कुटुंबीयांना झाली. समुपदेशनानंतर त्यांनी अवयवदानास संमती दिली. या निर्णयामुळे दुःखाच्या प्रसंगातही इतर कुटुंबांना आशेचा किरण मिळाला.

कोणाला मिळाले नवजीवन?

यकृताचे प्रत्यारोपण न्यू इरा रुग्णालयातील ६४ वर्षीय पुरुष रुग्णावर करण्यात आले. एका किडनीचे प्रत्यारोपण याच रुग्णालयातील ६२ वर्षीय पुरुष रुग्णावर, तर दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण वर्ध्यातील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील ५४ वर्षीय पुरुष रुग्णावर करण्यात आले.

अवयव वेळेत कसे पोहोचवले?

अवयव सुरक्षितपणे आणि वेळेत रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्यासाठी अमरावती-नागपूर आणि अमरावती-वर्धा असे दोन ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले. पोलीस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांच्या सहकार्याने वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले. त्यामुळे अवयव वेळेत संबंधित रुग्णालयांत पोहोचवणे शक्य झाले.

या प्रक्रियेत कोणी पुढाकार घेतला?

झेडटीसीसी नागपूरचे अध्यक्ष डॉ. मनीष श्रीगिरीवार, सचिव डॉ. शैलेश गहुकर आणि प्रत्यारोपण समन्वयक दिनेश मंडपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. मनीषा यांच्या जाण्याने दोन मुलांचे मातृछत्र हरपले; मात्र त्यांच्या अवयवदानामुळे तीन कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण उजळला.