नागपूर : नागपुरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांना रशियातील ‘पर्म स्टेट विद्यापीठा’कडून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘प्रोफेसर एमेरिटस’ या बहुमानाने सन्मानित करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रशिया येथे हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या सन्मानामुळे नागपूरसह देशाचा सन्मान वाढला आहे.
विद्यापीठाने दिलेल्या गौरवपत्रात डॉ. चौधरी यांच्या ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होण्याचा आजार) विषयावरील सखोल संशोधनाची विशेष दखल घेतली आहे. विशेषतः विदर्भातील ग्रामीण भागात गाणी, अभंग, ऑनलाईन मार्गदर्शन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या अभिनव माध्यमांद्वारे महिलांमध्ये त्यांनी केलेल्या जनजागृतीचे कौतुक करण्यात आले आहे. ग्रामीण महिलांना या आजाराशी लढण्यासाठी सक्षम करणाऱ्या त्यांच्या ‘हिटको’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला जागतिक स्तरावर मिळालेल्या मान्यतेचाही विद्यापीठाने अभिमानाने उल्लेख केला आहे. याशिवाय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘चेअर प्रोफेसर’ म्हणून कार्यरत असताना डॉ. चौधरी यांनी राबविलेल्या ‘ब्लॉसम’ या आदिवासी आरोग्यावरील बहुआयामी संशोधन प्रकल्पाचीही नोंद घेण्यात आली आहे.
आदिवासींमधील आठ आजारांवर…
रामटेक, गोंदिया आणि गडचिरोली परिसरातील आदिवासी बहुल गावातील आदिवासी समुदायांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या आठ आजारांवरील त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि ‘एम्स’ (एम्स) यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात झालेल्या पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषदे’त त्यांच्या पुढाकाराचा विशेष उल्लेख विद्यापीठाने केला आहे. आदिवासी आरोग्य संशोधनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
२७ वर्षांपासून वैद्यकीय सेवा…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट, व्यवस्थापन परिषद तसेच नागपूर विभागीय समन्वयक या विविध पदांवर कार्यरत राहून वैद्यकीय शिक्षण पद्धती अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची कृतज्ञतापूर्वक दखल घेण्यात आली आहे. गेल्या २७ वर्षांपासून त्यांनी केलेली अखंड रुग्णसेवा, गोरगरीब रुग्णांना अल्पदरात दिलेली वैद्यकीय मदत आणि ऑस्टिओपोरोसिसविषयी जनजागृती करण्यासाठी केलेले कार्य हे सामाजिक सेवेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. त्यांच्या व्यावसायिक व शैक्षणिक कार्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात नवे मानदंड निर्माण झाले असून, याच अद्वितीय योगदानाच्या गौरवार्थ हा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात येत असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
