नागपूर : शाळा सुरू होऊन जेमतेम दोन दिवस होत नाहीत तोच पंचशील चौकाजवळ मोठी दुर्घटना होता होता वाचली. शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या स्कुल बसला महापालिकेच्या आपली बसने धडक दिली. या घटनेत चार मुले जखमी झाली आहेत.
पंचशील सिनेमा गृहाजवळ सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात घडला. स्कूल व्हॅन ला महापालिकेच्या आपली बससेवेच्या बसने धडक दिली. सकाळी नागपुरातील पंचशील चौकावर पत्रकार भवनातून कॅनल रोड कडे जाणाऱ्या स्कूल व्हॅन ला हा अपघात झाल्याचे परिसरात एकच खळबळ उडाली.
बसची धडक जोरदार असल्यामुळे स्कूल व्हॅन चा काही भाग चेपला गेला. तर आत मध्ये बसलेले विद्यार्थी त्यांच्या सीट वरून खाली कोसळले. या घटनेत तीन ते चार विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना प्रथमोपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माहिती मिळताच पालकांची धाव
अपघातग्रस्त बस ही सेंट उर्सूला शाळेची बस होती. ती मुलांना वेगवेगळ्या भागातून घेऊन शाळेच्या दिशेने जात होती. त्यातली काही मुले फिजिक्सवाला शिकवणी वर्गाकडेही जाणार होते. सकाळी सव्वासातच्या सुमारास बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच घाबरलेला पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी देखील घटनास्थळी दाखल होत जखमी मुलांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
