नागपूर : भारतीय सैन्य दलाच्या प्रमुखपदी जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. पांडे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांना सैन्यदलाचे सर्वोच्च पद मिळाल्याने नागपूरकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. ते जनरल मनोज नरवने यांची जागा घेतील. सैन्यदलाचे प्रमुखपद सलग दोनदा महाराष्ट्राला मिळण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.

मनोज पांडे हे नागपूरचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि लोकसत्ताचे स्तंभलेखक राहिलेले डॉ. सी.डी. पांडे आणि आकाशावणीच्या उद्घोषिका प्रेमा पांडे यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. पांडे कुटुंबीय अमरावती रोडवरील हिंदुस्थान कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. मनोज पांडे यांचा एकुलता एक मुलगा अक्षय पांडे भारतीय वायुसेनेत कमिशन्ड ऑफिसर असून, त्यांची नेमणूक बंगलोर येथे आहे. लेफ्टनन्ट जनरल मनोज पांडे यांच्या पत्नी अर्चना पांडे दंत चिकित्सक आहेत.

सैन्य दलातील कारकीर्द

जनरल पांडे यांची डिसेंबर १९८२ मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्ती झाली. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बर्ली (ब्रिटन) मधून पदवीधर आहे. त्यांनी दिल्लीतील आर्मी वॉर कॉलेज महू आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी) येथे हायर कमांड कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. ३७ वर्षांच्या राष्ट्रसेवेच्या काळात पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. पांडे यांनी १ जून रोजी इस्टर्न आर्मी कमांडचे नवीन कमांडर (जनरल ऑफिसर कमांिडग-इन-चीफ) म्हणून पदभार स्वीकारला होता. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यांमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे रक्षण करण्यासाठी पांडे तैनात होते. याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. लेफ्टनंट जनरल पांडे पूर्व कमांडचे प्रमुख होण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते.

‘एनडीए’तून प्रारंभ

जनरल मनोज पांडे यांचे शालेय शिक्षण नागपुरातील वायुसेना नगरातील केंद्रीय विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये (एनडीए) प्रवेश घेतला. तेथूनच त्यांच्या लष्करी कारकिर्दीला प्रारंभ झाला. खडकवासला येथून एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते देहरादून येथील इंजिनिअिरग रेजिमेंटमध्ये रुजू झाले. ते १ फेब्रुवारीपासून सैन्यदलाचे उपप्रमुख आहेत.