नागपूर : धंतोली येथील बलराज मार्गावरील निवासी संकूल परिसरातून बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबातील पाचही जण पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे सुखरुप सापडले. त्यामुळे एका बाजुला नागपूर आणि पुणे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. तर दुसऱ्या बाजूला सुरक्षित सापडलेल्या कुटुंबाची पोलीस पथकांनी केलेल्या चौकशीतून काही धक्कादायक माहिती समोर येत आहे.
इतक्या रकमेचे घेतले होते कर्ज….
परसवानी कुटुंबातले पाच जण २६ जूनरोजी कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्याने नागपुरात खळबळ उडाली होती. शहरत एका पाठोपाठ एक घडत असलेल्या हत्याकांडाच्या सत्रानंतर संपूर्ण पोलील यंत्रणा सतर्क झाली होती. मोठ्या भावाने धंतोली पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले. एकत्र कुटुंबातील आई हर्षा, मुलगा जितेंद्र, सुन इशिता, नात खुशी आणि नातू कृष्णा परसवानी हे पाच सदस्य दहा दिवसांपासून नेमके कुठे गेले, असावेत याचे कोडे निर्माण झाले होते. भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांचा कसलाही ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला होता. यात कर्जबाजारीपणाची शक्यताही पडताळून पाहिली जात होती.
कर्जाच्या विवंचनेने सोडले गाव….
कुटुंब प्रमुख जितेंद्र परसवानी यांचे जयताळा चौकात जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. त्यांनी व्यवसायासाठी अनेकांकडून कर्जाची उचल केली होती. थोडे थोडे करून त्यांच्यावर 30 लाखांहून अधिक रकमेच्या कर्जाचा बोजा चढला होता. त्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. याच विवंचनेतून त्यांनी कुटुंबासह गाव सोडून पलायन केल्याचे जितेंद्र यांनी पोलिसांनी केलेल्या चौकशीतून कबूल केले आहे.
युपीआय ट्राझेक्शनमुळे सुटले कोडे….
जवळची रोख रक्कम संपल्याने जितेंद्र परसवानी यांनी मंगळवारी पिंपरी चिंचवड भागातल्या वैभवनगरातून एका बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढली. तेथून जवळच असलेल्या एका दुकानातून खरेदी केलेल्या काही वस्तूंच्या बदल्यात त्यांनी जी- पे या ऑनलाईन व्यवहार केले. इकडे बेपत्ता कुटुंबातील सदस्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने पोलिसांचे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या बँक खात्यांवर लक्ष होते. त्यामुळे हे व्यवहार होताच, पोलिसांच्या तपासात हा महत्त्वाचा धागा ठरला. या डिजिटल व्यवहारातून कुटुंबाचे लोकेशन पिंपरी-चिंचवड येथे असल्याचे निष्प्न झाल्याने पोलिसांचे विशेष पथक बुधवारी तातडीने पिंपरी चिंचवड येथेही पोहोचले.
