नागपूर : पाळीव प्राणी आणि माणसांमधील नातं किती घट्ट असू शकतं, याचं हळवं उदाहरण नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे पाहायला मिळालं. तब्बल २७ वर्षे कुटुंबातील सदस्याप्रमाणे राहिलेल्या ‘टीटी’ या पोपटाच्या मृत्यूनंतर रजत कुटुंबाने त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करत अखेरचा निरोप दिला. एवढेच नव्हे, तर त्याच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून स्मृतिस्थळ उभारण्याचाही निर्णय घेतला आहे.

संकटात सापडलेल्या पोपटाचे संगोपन

पारशिवनी येथील प्रशांत सुरजलाल रजत यांच्या घरात टीटीचे आगमन १० मार्च १९९९ रोजी झाले होते. संकटात सापडलेल्या या पोपटाला त्यांच्या वडिलांनी घरी आणले आणि त्याचे संगोपन केले. कालांतराने टीटी हा केवळ पाळीव पक्षी न राहता घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. आज अनेकांच्या घरात असा पाळीव पक्षी किंवा प्राणी असतो, पण या पोपटाची कहाणी वेगळीच होती.

प्रकृती खालावताच पुण्यातून आले

प्रशांत हे पुण्यात सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. २७ जून रोजी टीटीची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती मिळताच त्यांनी पत्नी नंदिनीसह तब्बल १३ तासांचा प्रवास करून पारशिवनी गाठली. दुसऱ्या दिवशी, २८ जून रोजी टीटीने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबासाठी मोठा धक्का ठरली.

टीटीच्या जाण्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. अंत्यसंस्कारानंतर घरात दुःखाचे वातावरण पसरले होते. तो घरातील सदस्य असल्याने पाळीव पक्षी म्हणून त्यांच्याकडे रजत कुटुंबाने कधी पाहिलेच नाही.

टीटीच्या आठवणींना उजाळा

तो अत्यंत हुशार होता. जेवणाच्या वेळी तो सर्वांसोबत ताटाजवळ बसायचा, शिट्या वाजवायचा आणि घरभर मुक्तपणे वावरायचा. त्याच्या सवयी, आवाज आणि खोड्या आजही कुटुंबीयांच्या स्मरणात ताज्या आहेत. टीटी हा त्यांच्यासाठी पोपट नव्हता, तर घरातील सदस्य होता. त्याच्या जाण्याने घरातील एक व्यक्तीच निघून गेल्याची त्यांची भावना आहे, असे कुटुंबीय भावुक होत सांगतात. पोपटाच्या आठवणीतून तो अजूनही त्यांच्यासाठी घरातच आहे. तो गेला हे रजत कुटुंबीय अजूनही मानायलाच तयार नाही.

स्मृती जपण्यासाठी स्मृतिस्थळ

टीटीच्या स्मृती कायम जपण्यासाठी त्याचे स्मृतिस्थळ उभारण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला आहे. पाळलेल्या प्राण्यावर एवढे निस्सीम प्रेम, त्याच्यासाठी एवढा मोठा निर्णय क्वचितच पाहायला मिळतो. माणूस आणि प्राणी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारी ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्राण्यांवर निस्सीम प्रेम करणाऱ्यांसाठी ही कथा केवळ एका पोपटाची नाही, तर भावनांच्या बंधाची आहे.