नागपूर : नेपाळमधील भीषण पूरस्थितीत आमच्या डोळ्यांसमोर बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. रस्ते आणि पूल तुटले होते, सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्ही या कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडलो, अशी भावना नेपाळमधून परतलेल्या नागपूरच्या भाविकांनी व्यक्त केली.
नागपूरमधील भाविक शिवपुराण कथेसाठी नेपाळमधील पशुपतीनाथ येथे गेले होते. या प्रवासात त्यांनी पोखरा, मुक्तिनाथ आणि त्यानंतर पशुपतीनाथ असा प्रवास केला. सुरुवातीला हवामान चांगले होते. त्रिशूली नदीचा पूल पार करून ते पशुपतीनाथ येथे पोहोचले. योगेश गावंडे यांनी सांगितले की, एक दिवस आधीच आम्ही नदी ओलांडून काठमांडूला परत आलो होतो. पुराची भयावह स्थिती आम्हाला माहिती नव्हती. परंतु त्यांची त्रिव्रता कळाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. “मुक्तिनाथच्या परिसरात रस्ते आणि पूल तुटले होते. पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले होते. आम्ही काठमांडूकडे निघालो, मात्र पुढे जाणे धोकादायक झाले. पुराचा एकच मार्ग उपलब्ध होता. आमच्या बसमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक होते. त्यामुळे प्रत्येक क्षणी भीती वाटत होती, अपूर्वा गावंडे यांनी सांगितले. आमच्या सोबत तला अवधाने, साक्षी गावंडे, सुनंदा गावंडेसह १०६ जण होते.
आमदार प्रवीण दटकेंना फोन आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी केली संपूर्ण व्यवस्था योगश गावंडे यांनी सांगितले की, परतीच्या प्रवासात एका भाविकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. दरम्यान, नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांना संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांनी सर्व व्यवस्था करून दिली. त्यामुळे आम्हाला सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी मदत मिळाली,” असे त्यांनी सांगितले.
काठमांडूहून परतताना पहाडी रस्त्यांवरही मोठ्या अडचणी आल्या. मुसळधार पाऊस, रस्त्यावर पडलेली झाडे आणि पुराचे पाणी यामुळे प्रवास धोकादायक बनला होता. आम्ही चार बसने भारताकडे निघालो. पाऊस जोरदार होता. समोरचेही दिसत नव्हते. मागून एक समोर आली आणि ती पुराच्या पाण्यात वाहून गेली. यामुळे अधिकच भीती निर्माण झाली. अखेर नेपाळची सीमा पार करून भारतात प्रवेश केला. बिहारमध्येही स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदत केली. या सर्व सहकार्या केल्याचे अपूर्व गावंडे यांनी सांगितले.
आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत अडकलो होतो. आमच्या समोर बस वाहून गेली, रस्ते तुटले होते आणि सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस, प्रवीण दटके तसेच भारत आणि नेपाळच्या प्रशासनाने केलेल्या मदतीमुळे आम्ही सुखरूप परतलो, अशी प्रतिक्रिया योगेश गावंडे यांनी दिली.
