केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार, २५० वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या ई-बाईक्स आणि ई-वाहनांची वेगमर्यादा २५ किलोमीटरपेक्षा जास्त नको. मात्र, गेल्या दोन दिवसांत नागपूर जिल्ह्यातील तीन वाहन वितरकाकडे ३५ ते ४० किलोमीटरपर्यंत गती असलेले ११ ई- वाहनं आढळल्याने ते प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील (आरटीओ) अधिकाऱ्यांनी जप्त केले. ही कारवाई यापुढेही चालणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वतीने या कारवाया करण्यात आल्या. आयुक्त कार्यालयाने केलेल्या सूचनेनुसार, गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील तिन्ही आरटीओ कार्यालयाकडून ई-वाहन, ई-बाईक्सच्या तपासणीची मोहीम सुरू केली गेली. पहिल्या दिवशी सोमवारी आरटीओ अधिकाऱ्यांचे पथक वर्धमाननगर येथील एका वाहन वितरकाकडे धडकले. येथे २५० वॅटपेक्षा कमी क्षमतेचे २० वाहनं तपासल्यावर दोन वाहनांची गती ३५ ते ४० किलोमीटरदरम्यान आढळली.

ही दोन्ही वाहने जप्त करण्यात आली. दुसऱ्या दिवशी मंगळवारीही १५ ते २० वाहने तपासण्यात आली. पैकी ९ वाहने जप्त करण्यात आली. पैकी बहुतांश वाहनांमध्ये तीन स्वीच होते. पहिल्या स्वीचची गती १५ किलोमीटर, दुसऱ्याची ३० आणि तिसरे स्वीच दाबल्यास वाहन ३५ ते ४० किलोमीटरच्या गतीने धावत होते. नियमानुसार या संवर्गातील वाहनांना नोंदणीपासून सवलत असून वाहन चालकाला परवान्याची गरजही नाही. वितरकाकडे आढळलेले दोन्ही नियमबाह्य वाहन वाहने आरटीओकडून जप्त करण्यात आली. दरम्यान, हा प्रकार उपराजधानीतील ई-वाहन विक्रेत्यांना कळताच त्यांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आनंद मोड, राहुल वंजारी, स्नेहल पाराशर, मोरमारे आणि इतरही अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या केली. नियमबाह्य ई-वाहनांविरोधात यापुढेही कारवाई सुरू राहील, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police action against e bikes for over speeding scsg
First published on: 24-05-2022 at 16:55 IST