नागपूर : रस्ते, चौक, थांबे आणि वर्दळीच्या भागांत धुम्रपान करणे कायद्याने दंडनीय अपराध आहे. तरीही हा नियम धुडकावत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या सवयीवर बजाजनगर पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारणे सुरू केले आहे.
धुम्रपानासोबतच वाहतूक नियमांचा भंग आणि शहरातील शिस्त बिघडवणाऱ्या प्रकारांवर पोलिसांनी ऑपरेशन वॉश आऊट हाती घेतले आहे. गेल्या काही दिवसांत अचानक केलेल्या या कारवाईत नियम मोडणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवण्यात आला आहे.
बजाजनगर परिसरातील प्रमुख रस्ते, चौक आणि वर्दळीच्या भागांत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याप्रकरणी राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १८३ जणांवर कारवाई करण्यात आली. धुम्रपानामुळे सार्वजनिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. याच मोहिमेत वाहतूक मार्गावर बेकायदेशीररीत्या खाद्य विक्रीची दुकाने थाटणाऱ्या २१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणखी १० जणांना पोलिसांनी स्वतंत्रपणे दंड ठोकला.
शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी ६ जणांवर दंड ठोठावण्यात आला. नियमबाह्य पद्धतीने मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. याशिवाय, खानावळीत मद्यपानास जागा दिल्याप्रकरणी तीन रेस्टॉरंट्सना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास पुढील काळात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. सराईत ८ गुन्हेगार जाळ्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
तपासादरम्यान गुन्हेगारी नोंद असलेल्या ८ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या हालचालींमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. बजाजनगर पोलिसांची ही कारवाई शहरातील शिस्त, सुरक्षितता आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरत असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अशीच मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
