नागपूर : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात सण उत्सव काळात वाजलल्या जाणाऱ्या डीजेवरून वादळी चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता उपराजधानीतही आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासनाने गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ३ सप्टेंबर च्या मध्यरात्री १२ वाजेपासून ते १ नोव्हेंबर २०२६ च्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत डॉल्बी, प्लाझ्मा आणि प्रेशरमिड साऊंड सिस्टिमच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुरुवारी या बाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

काय आहेत आदेशात नमूद मुद्दे?

  • बंदीचा कालावधी ३ सप्टेंबर २०२६ रात्री १२ वाजेपासून १ नोव्हेंबर २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहील.
    -या कालावधीत शहरात गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजुद्दीन बाबा उत्सव, गणेशोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दुर्गादेवी उत्सव साजरे होणार आहेत. त्यामुळे या काळात निघणाऱ्या मिरवणुका व कार्यक्रमांवर ही बंदी लागू असेल.
    -उत्सव आणि मिरवणुकांच्या काळात आवाजाच्या प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
    -रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर लेजर लाईटमुळे दृष्टीस इजा होऊ शकते. अचानक तीव्र लेझर पडल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
  • कायदा व सुव्यवस्था: अपघातांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सिस्टिम सिलबंद ठेवण्याचे निर्देश:

डॉल्बी (टॉप, मिड, बेस मल्टीस्पीकर), प्लाझ्मा व प्रेशरमिड साऊंड सिस्टिम मालक, चालक, आयोजक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या सिस्टिम व त्यासाठी मूळ रचनेत बदल केलेली वाहने सिलबंद स्थितीत ठेवावीत, असेही पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.
मल्टीलेयर साऊंड सिस्टिममुळे पर्यावरण संरक्षण कायदा व ध्वनी प्रदूषण नियम मधील मर्यादेचे उल्लंघन होते. तसेच वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केल्याने अपघात घडणे, मंडळांचे कार्यकर्ते व पोलीस यांच्यात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते.

नियम मोडल्यास कठोर कारवाई

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. ध्वनीप्रदूषण करणारे डिजे आणि लेजर लाईटचे साहित्य जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

फक्त यांना असेल सूट….

ध्वनी प्रदूषण (विनियमन आणि नियंत्रण) नियम २००० मधील तरतुदींनुसार ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन न करणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टिमला या बंदीतून सूट देण्यात आली आहे