नागपूर : कौटुंबिक कलह मिटवून तुटणारे संसार पुन्हा सांधण्यासाठी महत्त्वपूर्ण केंद्र ठरणाऱ्या नागपूर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ची अवस्था सध्या चिंताजनक झाली आहे. पूर्वी भरोसा सेलमध्ये १० समुपदेशक कार्यरत होते. मात्र आता ही संख्या घटून केवळ दोनवर आली आहे. पुरेसे समुपदेशकच नसल्यामुळे पोलिसांच्या या भरोसा उपक्रमावरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होत आहे. परिणामी, पती-पत्नी वादात समेट घडण्याऐवजी प्रकरणे न्यायालयाच्या दरबारात जात आहेत.

भरोसा सेलकडे २०२५ मध्ये वर्षभरात एकूण १९१२ प्रकरणे आली होती. १० समुपदेशकांच्या मदतीने तब्बल ६६२ प्रकरणांमध्ये (३५ टक्के) समेट घडवण्यात आला होता. पण चालू वर्षात २०२६ मध्ये दहा महिन्यांत एकूण १५९७ नवीन प्रकरणे भरोसा सेलकडे आली. मात्र, अवघ्या दोन समुपदेशकांवर कामाचा ताण वाढल्याने अवघ्या ३५६ प्रकरणांतच (२२ टक्के) समेट घडवून आणता आला.

वेळेवर समुपदेशन न मिळाल्यामुळे आणि संवाद खंडित होऊन दुरावा वाढल्याने प्रकरणे सामोपचाराने मिटण्याऐवजी कोर्ट-कचेऱ्या किंवा ४९८ अ अंतर्गत कायदेशीर कारवाईकडे वळत आहेत. अशी ६७ प्रकरणे ४९८ अंतर्गत जिल्हा न्यायालयालयाकडे तर ९७ प्रकरणे कौटुंबिक न्यायालयाकडे पाठवण्यात आली. या सोबतच भरोसा सेलकडे २०२५ मध्ये वर्षाच्या शेवटी एकही प्रकरण प्रलंबित नव्हते, तर यंदा सप्टेंबरअखेर ४९७ प्रकरणे तशीच पडून आहेत.

स्वतःहून मदत मागणाऱ्यांची संख्याही घटली…

पती-पत्नींमधल्या वादावर तोडगा निघावा, यासाठी भरोसा सेलकडे चालू वर्षात १२७५ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडून वर्ग झाली. याखेरीज ३२५ जोडपी स्वतः भरोसा सेलकडे मदत मागण्यासाठी आली. गेल्यावर्षी पोलीस ठाण्यांकडून वर्ग झालेल्या प्रकरणांची संख्या १४९६ होती. तर ४१६ जोडपी स्वतः भरोसा सेलकडे आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दोन टक्क्यांनी घटले. समुपदेशकांअभावी तोडगा काढण्यात विलंब होत असल्याने हे जोडपे महापालिकेच्या वन स्टॉप समुपदेशन केंद्राकडे वळत आहेत.

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत ४ टक्के वाढ…

भरोसा सेलकडे चालू वर्षात कौटुंबिक हिंसाराची १८५ प्रकरणे तोडगा काढण्यासाठी आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत याची संख्या ३३ ने वाढली. विशेष म्हणजे, समुपदेशनाअभावी तोडगाच न निघाल्याने ९७ प्रकरणे कौटुंबिक हिंसाचार काद्यद्यांतर्गत न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहेत.

काय म्हणाले पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील….

समुपदेशकांच्या तुटवडा आहे, हे खरे आहे. त्यामुळे भरोसाच्या मूळ उद्देशाला धक्का बसला असे म्हणने योग्य नाही. त्यांच्या मानधनाचा तिढा सोडवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या सचिवांशी बोलून मार्ग काढू. समाजसेवेचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या पोलीस दलातील महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना समुपदेशक म्हणून कायमस्वरूपी नियुक्त केले जाऊ शकते असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.