भूमाफियांना पोलीस आयुक्तांचा इशारा

शहराचा विकास होत असताना जमिनीचे भाव गगनाला भिडले आहे. यात स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठी येन-केन मार्गाने लोकांचे भूखंड हडपणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. भूखंड हडपणाऱ्यांनी लोकांचे भूखंड परत करावे, अन्यथा एखादी तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची गाठ पोलिसांशी आहे, हे लक्षात घ्यावे. लोकांचे भूखंड परत करणाऱ्या भूमाफियांना दया दाखविण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिला.

भूमाफिया दिलीप ग्वालबंशी याच्याविरुद्ध आतापर्यंत मानकापूर, गिट्टीखदान आणि कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत ७ जमीन हडपण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांच्याही भूखंडांचा समावेश आहे. आता ग्वालबंशीविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर लोक समोर येऊन तक्रार दाखल करीत आहेत. यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, शहरात भूखंड हडपण्याचे, बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक करण्याचे प्रकार समोर आल्यानंतर अशा प्रकरणाच्या तपासाकरिता ‘प्रॉपर्टी सेल’ तयार करण्यात आला. या सेलकडे येणाऱ्या तक्रारींची सखोल चौकशी करून संबंधित भूमाफिया, कथित गुंडांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. त्या अंतर्गत दिलीप ग्वालबंशी याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याला जेरबंद करण्यात आले. आता ग्वालबंशी आणि इतर आरोपींविरुद्ध अधिक कठोर कारवाई करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. मोक्कांतर्गत कारवाई करता येईल का, हे तपासण्यात येत आहे. त्यांनी शेकडो लोकांचे भूखंड हडपले असून त्यांना न्याय देण्यासाठी एक विशेष तपास पथक नेमले आहे, असेही ते म्हणाले.

या तपासानंतर शहरातील हुडकेश्वर, मनीषनगर, जयताळा आदी भागांमध्येही लोकांचे भूखंड हडपण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्या परिसरातील भूमाफियांविरुद्धही अशीच कारवाई करण्यात येईल. परंतु कारवाई प्रारंभ करण्यापूर्वी भूमाफियांनी संबंधितांना भूखंड परत करावे. एकदा तपास सुरू झाला, तर अशा भूमाफियांची खर नाही, असा सज्जड दम आयुक्तांनी दिला आहे.

या सोसायटय़ांमधील शेकडो भूखंड हडपले

दिलीप ग्वालबंशी आणि त्याच्या साथीदारांनी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेताजी हाऊसिंग सोसायटी, वैभवानंद सोसायटी, गरीब ख्वाजा नवाब सोसायटी, गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सचिन सोसायटी, नर्मदा हाऊसिंग सोसायटी, अनुपम हाऊसिंग सोसायटी आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नसीमन हाऊसिंग सोसायटी व तवक्कल हाऊसिंग सोसायटीतील अनेक भूखंड हडपले आहेत. यातील तीन ते चार सोसायटय़ांमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पन्नासवर भूखंड असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी २९ पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

नागरिकांचा भूखंडांवर ताबा

दिलीप ग्वालबंशी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच व तो जेरबंद होताच नागरिकही समोर यायला लागले आहेत. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैभवानंद हाऊसिंग सोसायटीतील जवळपास २५ सदस्यांनी पुन्हा आपल्या भूखंडाचा ताबा घेण्यास सुरुवात केली असून त्या ठिकाणी सुरक्षाभिंत बांधण्याला सुरुवात केली आहे. वैभवानंद येथील रतन बैरवारे आणि जसवाल भूषणवार हे २६ वर्षांपासून भूखंडासाठी लढा देत आहेत. आता त्यांना भूखंड परत मिळाले असून त्यांनी पोलिसांना धन्यवाद दिले.