नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मातोश्री नगर परिसरात गुरुवारी उशिरा रात्री घडलेल्या एका थरारक आणि धक्कादायक घटनेने नागपूर हादरले आहे. मुलीसोबत असलेल्या मैत्रीला विरोध केल्याच्या रागातून एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने (तरुणाने) आपल्या साथीदारांसह राज्य राखीव पोलीस दलात चालक असलेल्या (एसआरपीएफ) शिपायाच्या छातीतच लोखंडी सळई खुपसली. या घटनेत शिपायाचा मृत्यू झाला असून एक नातेवाईक गंभीर जखमी आहे.

पंकज ठाकूर (४२) असे दगावलेल्या एसआरपीएफमधील शिपायाचे नाव आहे. तर त्यांचे मेहुणे अर्पित (३०) यांची प्रकृती गंभीर असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश हरिदास मंडल (२३) याची मागील अनेक महिन्यांपासून पंकज ठाकूर यांच्या अल्पवयीन मुलीशी मैत्री होती. दोघांचे बोलणे ठाकूर यांना आवडत नव्हते. या मैत्रीला ठाकूर यांनी कडाडून विरोध केला होता. अनेक वेळा समज देऊनही आकाश मागे हटत नसल्याने घरात तणावाचे वातावरण होते.

दरम्यान, गुरुवारी रात्री परिसरातील मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू होता. या गर्दीत आकाश पुन्हा त्या मुलीशी बोलताना पंकज ठाकूर यांच्या नजरेस पडला. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून आकाशला तेथून निघून जाण्यास सांगितले. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. घटनेनंतर आकाश शांतपणे तेथून निघून गेला. मात्र, काही वेळातच तो पुन्हा काही सहकाऱ्यांसह परतला. यावेळी सर्वांच्या हातात लोखंडी सळई व काही धारदार शस्त्रे होती. काहीतरी अनर्थ घडणार असल्याची चाहूल लागण्याआधीच मुख्य आरोपी आकाशने लोखंडी सळई ठाकूर यांच्या छातीत खुपसून त्यांची हत्या केली.

निर्घृण हल्ला, रक्तरंजित रात्र…

अचानक झालेल्या हल्ल्यात पंकज ठाकूर यांना लक्ष्य करत आरोपींनी धारदार शस्त्रांनी वार केले. दरम्यान, तेथे असलेले अर्पित यांनी धाव घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी निर्दयपणे अर्पितलाही मारहाण केली. परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्तबंबाळ अवस्थेत दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी पंकज ठाकूर यांना मृत घोषित केले.

आरोपीला अटक…

सदर प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी आकाश मंडलसह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांकडून पुरावे गोळा करण्यात येत असून घटनेच्या नेमक्या कारणाबाबतही माहिती घेतली जात आहे.