नागपूर : जातीय किंवा सामाजिक संघर्षांमागे अशिक्षितपणा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे असल्याचा सर्वसाधारण समज आहे. मात्र, शहरातील गुन्हेगारीच्या आकडेवारीतून वेगळेच चित्र समोर आले आहे. चालू वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत नोंदवण्यात आलेल्या दंगलसदृश एकूण ५६ घटनांपैकी १९ म्हणजे जवळपास एकतृतीयांश घटना विशिष्ट भागांमध्ये घडल्याचे पोलीस नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ज्या भागांमध्ये या घटना घडल्या त्यातल्या झोपडपट्टीबहुल भागासह हा परिसर उच्चश्रूंची वस्ती म्हणूनही ओळखला जातो.
गेल्यावर्षी २०२५ मध्ये शहरात दंगलीच्या घटकातील जातीय संघर्षाच्या एकूण १०३ घटना घडल्या होत्या. त्यापैकी सर्वाधिक २२ घटनांची नोंद सीताबर्डी, धंतोली, अंबाझरी, सदर आणि मानकापुरात झाली होती. चालू वर्षातही शहरात घडलेल्या दंगलीच्या ५६ पैकी सर्वाधिक १९ घटना याच भागांमध्ये घडल्या. त्यामुळे विशिष्ट लोकवस्ती भागात उच्चशिक्षितांमध्ये वाढणारी कट्टरता, दोन गटांतील संघर्ष, धार्मिक वाद आणि वर्चस्व किती विकोपाला जात आहे, हे स्पष्ट होत आहे.
शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून रस्त्यावरील किरकोळ वाद थेट प्राणघातक हाणामाऱ्यांमध्ये बदलत असल्याने सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. २०२५ मध्ये शहरात हाणामारीची १,१८८ गुन्हे नोंदवले गेले होते. यंदा २२ मेपर्यंतच या घटनांचा आलेख ५७९ वर पोहोचला. धक्कादायक बाब म्हणजे जीव घेण्याच्या उद्देशाने घडलेल्या घटनांपैकी निम्म्या घटना वाडी- एमआयडीसी आणि वाठोडा- कळमना हद्दीत घडल्या. त्यामुळे शहरात किरकोळ वादातून घडणारा हिंसाचारही चव्हाट्यावर येत आहे.
सर्वाधिक अपहरण कळमना, वाठोडात
चालू वर्षात शहरात अल्पवयीन मुली आणि महिलांच्या अपहरणाच्या २२० घटनांची नोंद झाली. २०२५ मध्ये हा आकडा ५२९ वर होता. अपहरणाच्या सर्वाधिक ४७ घटना कळमना, वाठोडा, पारडीत नोंदवल्या गेल्या. नागपुरातील महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर बनत चालल्याचे पोलिसांनीच नोंदवलेल्या गुन्ह्यांचे आकडे सांगत आहेत. शहरात २०२५ मध्ये विनयभंगाच्या ४८२ घटना घडल्या होत्या. चालू वर्षात आतापर्यंत हा आकडा २०० चा टप्पा ओलांडून समोर गेला आहे. वर्ष संपण्यासाठी आणखी सात महिने अवधी असताना हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
गेल्यावर्षी महालमध्ये झालेला उद्रेक हा जातीय होता. चार ते सहा लोकांपेक्षा अधिक जणांनी संघटित होऊन जातीय संघर्ष म्हणता येत नाही. घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलांसंदर्भात अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. केलेली हाणामारी दंगलसदृश परिस्थितीत हाताळली जाते. त्यामुळे दंगलीचे गुन्हे वाढल्याचे दिसते. तरीही याला त्यामुळे अपहरणाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. – डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त
