नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनने १७३ नागरिकांना आनंदाच्या सुखद क्षणाचा मोठा दिलासा मिळवून दिला. पदरमोड करत, कर्ज घेऊन हजारो रुपये खर्च करत खरेदी केलेले महागडे भ्रमणदूरध्वनी संच हरवल्याने ते सापडण्याची आशा सोडून दिलेल्या नागपूरकरांना गणेशपेठ पोलिसांनी या सुखद क्षणाचा अनपेक्षित अनुभव करून दिला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भावना हास्य उमटवणारी ठरली.
हरवलेले तब्बल १७३ भ्रमणध्वनी संच शोधून काढत पोलिसांनी ते मूळ मालकांना परत केले. विशेष म्हणजे चोरी अथवा हरवलेले भ्रमणदूरध्वनी संच शोधून काढण्यासाठी पोलिसांनी मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्रप्रदेश छत्तीसगड सारख्या राज्यांपर्यंत माग काढला. तब्बल ३४ लाख ४० हजार रुपये मुल्य असलेले हे भ्रमणदूरध्वनी संच पोलिसांनी मूळ मालकांकडे सुपूर्द केले.
हल्लीचे युग स्मार्ट आहे. त्यामुळे प्रत्येकजण छोट्यातल्या छोट्या आर्थिक व्यवहारासाठी भ्रमणदूरध्वनीचा वापर करतो. क्षुल्लक खरेदीपासून ते मोठ्या रकमेपर्यंत सर्व व्यवहार मोबाईलवर करण्याकडे सर्वांचा कल आहे. त्यामुळे मोबाईल फोन हा जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. अशा परिस्थितीत तो हरवल्यास त्यातली माहिती आणि अर्थव्यवहार खोळंबतात. त्यामुळे अनेकांची दुसरा फोन खरेदी करे पर्यंत गैरसोय होते.
शहरात दररोज विविध कारणांनी भ्रमणध्वनी हरवण्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल होत असतात. रेल्वे, बस प्रवासादरम्यानही गाडी पकडण्याच्या धावपळीत अनेकांचे भ्रमणदूरध्वनी संच गहाळ होतात. महागडे स्मार्टफोन, वैयक्तिक छायाचित्रे, महत्त्वाची कागदपत्रे, बँकिंग अॅप्स आणि संपर्क क्रमांकामुळे मोबाईल हरवणे म्हणजे अनेकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, आयएमईआय क्रमांकाचा मागोवा, सायबर तज्ज्ञांची मदत आणि गोपनीय माहितीच्या आधारे हे मोबाईल शोधून काढले. केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करत तपास पूर्ण करण्यात आला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात नागरिकांना त्यांचे हरवलेले भ्रमणध्वनी परत देण्यात आले. मोबाईल हातात पडताच अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला.
