अनिल कांबळे
नागपूर : राज्यातून बेपत्ता किंवा अपहरण होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी नागपूर पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली असून या पथकाच्या माध्यमातून बेपत्ता झालेल्यांपैकी ८४ टक्के व्यक्तींचा शोध घेण्यात यश मिळवले आहे. हेच प्रमाण मुंबईत ७२ तर पुण्यात ८१ टक्के आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात मुंबई-पुण्यापेक्षा नागपूर पोलीस सरस ठरल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.
राज्यभरातून अपहरण, फूस लावून पळवून नेणे, बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांपासून बरीच वाढ झाली आहे. पूर्वी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ तक्रार दाखल करून तपास करण्यात येत होता. परंतु, नागपूर पोलिसांनी अशा गुन्ह्यांमध्ये गांभीर्य दाखवून बेपत्ता अल्पवयीन मुली-तरुणी आणि महिलांची संख्या पाहता गुन्हे शाखेच्या अखत्यारित मानवी तस्करी प्रतिबंधक पथक (एएचटीयू) स्थापन केले. सुरुवातीला सहायक निरीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याकडे या पथकाचे नेतृत्व देण्यात आले. आता या पथकाची धुरा पोलीस निरीक्षक मंदा मनगटे, सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ या सांभाळत आहेत. या पथकाने अगदी काही दिवसांतच नेत्रदीपक कामगिरी केली. अनेक अल्पवयीन मुला-मुलींचा तातडीने शोध घेतला तसेच प्रेमप्रकरणातून पळून गेलेल्या मुलींचाही छडा लावला. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यास एएचटीयू लगेच सतर्क होते. या पथकाच्या मदतीने २०२१ मध्ये ३ हजार ७५५ बेपत्ता महिला-पुरुष आणि अल्पवयीन मुला-मुलींमधून ३,०६३ व्यक्तींना शोधण्यातयश मिळाले. हे प्रमाण ८४ टक्के आहे.
बेपत्ता होण्याची कारणे

  • पती-पत्नीत कौटुंबिक वाद
  • पती किंवा पतीचे अनैतिक संबंध
  • स्वाभिमान दुखावल्याने घर सोडणे
  • नैराश्य आणि जीवनाचा कंटाळा
  • अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष
  • प्रेमप्रकरणातून असलेले शारीरिक आकर्षण
  • कुटुंबाचा विरोध झुगारून प्रियकरासोबत पलायन
  • कुटुंबाकडून होणारा शारीरिक व मानसिक त्रास

शहरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी एएचटीयू पथक स्थापन केले आहे. या पथकाच्या माध्यमातून बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी विशेष प्रयत्न केले जातात. अल्पवयींनाचा शोध घेण्यासाठी पोलीस सतर्क असतात. अल्पवयीन मुला-मुलींच्या बेपत्ता होण्याला गांभीर्याने घेऊन तातडीने शोध घेण्यात येतो. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर.
बेपत्ता व शोधलेल्यांची स्थिती
वर्ष पुरुष महिला मुले मुली
२०१९ १६४९ १९७० १६५ ३८१
(शोधली) १४८४ १८५९ १५७ ३७१
२०२० ११४५ १३४३ ९३ २५१
(शोधली) १०१८ १२५० ८५ २४१
२०२१ १२९५ १६४८ ९९ ३१६
(शोधली) ११०१ १५१३ ७८ २३१