नागपूर : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जटिल प्रक्रिया सुलभ झाली आहे. गुंतागुंतीच्या प्रक्रियांमध्ये प्रगत तंत्राचा वापर करून पर्याय शोधले जात असताना पोलीस दलाने देखील आता कृत्रिम बुद्धिमत्तेची कास धरली आहे.
पोलिस ठाण्यात तक्रारींची नोंद करण्यासाठी लागणारा वेळ आणि मनुष्यबळाचा तिढा सोडवण्यासाठी नंदनवन पोलिस ठाण्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजमाध्यमावरील व्हॉट्सअप व्हॉइस टायपिंग तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या नव्या प्रणालीमुळे तक्रार नोंद प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण केली जात आहे.
पूर्वी पोलिस ठाण्यात येणाऱ्या अदखलपात्र (एन.सी.) तक्रारी, भ्रमणदूरध्वनी पासून ते वाहन चोरीच्या फिर्यादी अथवा मौल्यवान वस्तू हरवल्याच्या तक्रारी नोंद करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागायचा. चोरीची फिर्याद नोंदवण्यासाठी पूर्वी १५ ते २० मिनिटे लागायचे. आता ती प्रक्रिया ३ ते ४ मिनिटांत होते. मोबाईल किंवा मौल्यवान वस्तू हरवल्याची तक्रार करण्यासाठी पूर्वी २० ते २५ मिनिटे लागायची. तीही आता ३ ते ४ मिनिटांत पूर्ण होत आहे.
त्यात तक्रारीची पोलीस डायरीवर नोंद केल्यानंतर त्याची सीसीटीएनएस प्रणालीवरही टंकलिखित नोंद करावी लागत होती. यातही बराच कालावधी लागत होता. तक्रार नोंदवून त्याची प्रत तक्रारदाराला देण्याची प्रक्रिया देखील वेळखाऊ होती. त्यामुळे अनेकदा नागरिकांना पोलिस ठाण्यात प्रतीक्षा करावी लागत होती.
टंकलेखनासाठी व्हॉईस टायपिंगचा पर्याय
त्याची दखल घेत नंदनवनचे ठाणेदार कैलास देशमाने यांनी अंमलदारांना टंकलेखनासाठी व्हॉईस टायपिंगचा पर्याय सुचवला. त्या आधारे तक्रार टाईप झाल्यानंतर कृत्रिम बुद्धित्तेचा वापर करून त्यात तांत्रिक दुरुस्ती करण्यात आली. त्या नंतर ही तक्रार पोलीस व्हॉट्सअप गटातील सीसीटीएनएस टीमला पाठवली. अवघ्या तीन मिनिटांत ठाण्यात बसलेल्या अंमलदाराने कॉपी पेस्ट करत त्याची नोंद घेतली.
संगणकीय साधनांचा वापर, सुलभ प्रणाली विकसित
नंदनवन पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून सर्व २०० महिला अंमलदारांना याचे प्रशिक्षण देण्यात आले. बसल्या ठिकाणी २ ते ३ मिनिटांत अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली. नंदनवन पोलिस ठाण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हॉइस टायपिंग आणि व्हॉट्सअॅपसारख्या उपलब्ध संगणकीय साधनांचा वापर करून सुलभ प्रणाली विकसित करण्यात आल्याने तक्रारदारांची तक्रार तात्काळ नोंदवून त्याची प्रत अल्पावधीत उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.
‘या प्रणालीमुळे पोलिसांच्या कामाचा ताण कमी होऊ शकतो. टंकलेखनातील मानवी चुका कमी करणेही शक्य आहे. सध्या नंदनवन, अजनी, इमामवाडा, सक्करदरा, हुडकेश्वर आणि बेलतरोडी अशा सहा ठाण्यांत प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केला जात आहे. टप्प्या टप्प्याने सर्वच ठाण्यात ही प्रक्रिया लागू होऊ शकते. त्यासाठी कुठलाही खर्च होत नाही. स्मार्टफोनमधील कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडीत उपलब्ध साधनांचा आधार घेऊनही अदखलपात्र गुन्ह्यांत तक्रार नोंद शक्य होत आहे.’
-रश्मिता राव, पोलिस उपआयुक्त
