नागपूर : ‘महिला किंवा विद्यार्थिनींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर नागपुरात महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष ‘निर्भया शक्ती पथक’ तैनात केले जाणार आहेत. पोलीस उपायुक्तालय स्तरावर कार्यरत या विशेष पथकात आयपीएस दर्जाचा अधिकारी, शस्त्रधारी पोलीस अधिकारी आणि प्रशिक्षित महिला पोलिसांची फौज तैनात केली जाणार आहे. महिलांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी हे विशेष मिशन हाती घेण्याचा धाडसी आणि अभिनव निर्णय घेतला आहे.
गर्दीच्या ठिकाणी टवाळखोरांवर नजर….
गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, बस स्थानके, मद्यालये, हॉटेल्स. रेस्टॉरंट रेल्वे स्थानकांसह तलावांसारखी मनोरंजनाच्या ठिकाणे आणि गर्दीच्या ठिकाणी ही पथके गस्त घालून टवाळखोरांवर नजर ठेवून तत्काळ कारवाई करणार आहे.
पथके लवकरच पोलीस दलात सज्ज
मवाल्यांना धडा शिकवण्यासाठी ही पथके लवकरच पोलीस दलात सज्ज केली जाणार आहेत. अनेकदा महिला किंवा तरुण मुली टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून शांत बसतात किंवा तक्रार करण्यास घाबरतात. याच भीतीला दूर सारून त्यांच्यात सुरक्षेचा विश्वास निर्माण करण्यासाठी ही विशेष पथक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणार आहेत.
निर्भया शक्ती ॲपसाठी चाचणी
महिला आयपीएस अधिकाऱ्यासोबत एकाच रात्री घडलेल्या छेडछाडीच्या अनेक घटनांमधून धडा घेत आंध्रप्रदेश राज्यात १६४ पथके शक्ती पथके कार्यरत करण्यात आली. ही पथके संकटात सापडलेल्या महिलांना मदत करण्याबरोबरच बचाव, हरवलेल्या आणि छळाच्या प्रकरणांमध्येही काम करतात, या पथकांसाठी तेथील पोलिसांनी शक्ती अॅप तयार केले आहे. त्याच धर्तीवर नागपूरच्या निर्भया शक्ती अॅपचीही निर्मिती केली जाऊ शकते, का याची चाचणी सुरू आहे.
अॅपच्याद्वारे पथकाला अलर्ट….
महिलांनी अॅपच्या माध्यमातून घडलेल्या घडनेची माहिती देऊन मदत मागताच संबंधित पोलीस उपायुक्तालयाच्या पथकाला संदेशाद्वारे अलर्ट करून तातडीने घटनास्थळी पाचारण केले जाऊ शकते, का याचीही सध्या चाचणी केली जात आहे.
ही असतील पथकाची वैशिष्ट्ये?
- साध्या वेशातील गस्त: हे पथक गणवेशातच नाही, तर साध्या वेशात गर्दीच्या ठिकाणी वावरणार आहे. पोलीस दलातील महिला अधिकारीच गर्दीच्या ठिकाणी वावरेल. त्यामुळे छेडछाड करणाऱ्यांना पोलिसांची उपस्थिती जाणवणार नाही. गणवेशातल्या पथकाची ओळख लपवून मवाल्याने रंगेहाथ पकडण्यावर भर दिला जाईल.
- हॉटस्पॉट्सवर विशेष लक्ष: शहरातील प्रमुख बाजारपेठा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, उद्याने, बस स्थानके, रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे, विरंगुळ्याच्या ठिकाणांवर पथकाची २४ तास करडी नजर असेल.
- तातडीने कारवाई: महिलांची छेड काढणे, त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहणे, पाठलाग करणे, इशारे करणे अशा प्रकारांवर हे पथक तत्काळ आणि कठोर कारवाई करेल.
- समुपदेशन आणि जागृती: केवळ कारवाईच नाही, तर गरजू महिलांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हेदेखील या पथकाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
“शहरातील प्रत्येक स्त्री, मुलगी आणि बहीण कोणत्याही भीतीशिवाय मोकळा श्वास घेऊ शकेल, असा सुरक्षित परिसर निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर पथकासाठी स्वतंत्र हेल्पलाइनवर संपर्क क्रमांक दिला जाईल.”
-विनिता साहू, अपर पोलीस आयुक्त
