नागपूर : स्फोटकाची बॅग नागपूर रेल्वेस्थानकावर ठेवून खळबळ उडवून देणाऱ्या व्यक्तीचा शोध २४ तास उलटून देखील लोहमार्ग पोलीस घेऊ शकलेले नाहीत. रेल्वेस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु त्यात अतिशय पुसट हालचाली टिपल्या गेल्या आहेत.

सोमवारी सायंकाळी जीआरपी वाहतूक नियंत्रण बुथजवळ एका काळय़ा रंगाच्या बॅगमध्ये जिलेटिनच्या (डिटोनेटर) कांडय़ा आढळून आल्या. जीआरपीच्या शिपायाला बेवारस पडून असलेली बॅग दिसली. त्यात स्फोटके असल्याचे समजल्यावर खळबळ उडाली. बॉम्ब शोधक ते निकामी करण्यासाठी घेऊन गेले. रात्री उशिरापर्यंत हे सर्व सुरू होते. परंतु ही बॅग आली कुठून, ती कोण तेथे ठेवून पसार झाला. या प्रश्नाचा उलगडा मंगळवारी रात्रीपर्यंत झाला नव्हता. यासंदर्भात लोहमार्ग पोलीसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेथे ही बॅग ठेवण्यात आली त्या ठिकाणापासून सीसीटीव्ही कॅमेरे फार लांब आहेत. त्यामुळे कॅमेऱ्यात काहीच स्पष्ट दिसत नाही. केवळ पुसटच्या हालचाली दिसून येत आहेत. त्यावरून त्या व्यक्तीची ओळख पटणे शक्य नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी शहर पोलीस तसेच गुन्हे शाखेची मदत घेतली जात आहे, असेही ते म्हणाले.

स्फोटकांचा वापर केवळ मोठा आवाज करण्यासाठी

रेल्वेस्थानकावर सापडलेले डिटोनेटर्स-६४ असून ते सौम्य आवाजात फुटणारी स्फोटके आहेत.  या स्फोटकांचा वापर केवळ मोठा आवाज करण्यासाठी करण्यात येतो. प्रशिक्षण संस्थेत किंवा शेतात वन्यजीवांना घाबरवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. या स्फोटकाचा वापर स्फोट करण्यासाठी होऊ शकत नाही. त्यामुळे भीतीचे कोणतेही कारण नाही. बॉम्ब शोधक-नाशक पथकाने ही स्फोटके ताब्यात घेतली असून तपासानंतर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल असून गुन्हे शाखासुद्धा त्यांना मदत करीत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.