नागपूर: गेल्या काही महिन्यांपासून शहरातील नामांकित हॉटेल्समध्ये हुक्का पार्लर बिनधास्तपणे सुरु होते. मात्र, नवीन पोलिस आयुक्त रुजू होताच सर्वात पहिला घाव त्यांनी हुक्का पार्लरवर केला आहे. हॉटेल हेरिटेजमध्ये गुन्हे शाखेने छापा घालून तब्बल ४५ जणांना ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे हुक्का पिताना आढळलेल्यांपैकी ९ जणी महाविद्यालयीन तरुणी आहेत.

या प्रकरणी हॉटेलचे मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील बजाजनगर, सीताबर्डी, एमआयडीसी, अंबाझरी आणि सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरु आहेत. या हुक्का पार्लरमधून काही पोलिस कर्मचारी वसुली करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे वरिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हुक्का पार्लरवर कारवाईस टाळाटाळ केली जाते. मात्र, नवीन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्विकारताच हुक्का पार्लरचे कंबरडे मोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

इथे पडला छापा…

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधीत पथकाने सिव्हिल लाइन्स परिसरातील हॉटेल हेरिटेज येथे गुरुवारी मध्यरात्री छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत हुक्का सेवन करताना आढळलेल्या ४५ तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, ३ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे डीसीपी दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस पथकाने ही धाडसी कारवाई केली.

राजकीय दबावाचा प्रयत्न…

पोलिसांनी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून विविध प्रकारचे हुक्का पॉट, फ्लेवर, कोळसा आणि इतर साहित्य जप्त केले. कारवाईदरम्यान काही राजकीय व्यक्तींनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा असली, तरी पोलिसांनी कोणताही दबाव न स्वीकारता कारवाई केली. या प्रकरणात हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापक यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

या पूर्वीही झाली होती कारवाई….

हॉटेल हेरिटेजमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याबाबत तक्रारी मिळाल्या होत्या. यापूर्वीही या हॉटेलवर कारवाई झाली होती. मात्र नंतर काही पोलिस कर्मचाऱ्यांमुळे येथे कारवाई होत नव्हती. यावेळी नियोजनबद्ध कारवाई करून पोलिसांनी संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. पोलिस आयुक्त नांगरे-पाटील यांनी पदभार स्विकारताच शहरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हुक्का पार्लर, अमली पदार्थ आणि इतर अवैध धंद्यांविरोधातील मोहीम सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे कारवाईपूर्वीच छाप्याची माहिती हॉटेलमालकापर्यंत पुरविणारे आता रडारवर आल्याची चर्चा आहे.