scorecardresearch

..अन् गादीखाली सापडला सोन्याचा हार!; पोलिसांची युक्ती अखेर यशस्वी

नाजूक नात्यांची विण उसवू नये म्हणून पोलिसांनी युक्ती लढवली अन चोरी गेलेला हार अगदी अलगद मिळून दिला.

सोन्याचा हार परत करताना पोलीस अधिकारी

नागपूर : बहादुरातील एका लॉनमध्ये लग्न होते. थाटामाटात लग्न लागल्यानंतर रात्री नवरीचा पाठवणीचा कार्यक्रम झाला. सर्व पाहुणे घरी जाण्याच्या तयारीत असताना काटोल येथील एका महिलेचा ७ तोळय़ांचा

सोन्याचा हार चोरी गेला. तिने पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. सक्करदरा पोलीस घटनास्थळावर पोहचले. तेथील सर्वच एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे कुणावर चोरीचा आळ घ्यावा हा पोलिसांना प्रश्न पडला.

नाजूक नात्यांची विण उसवू नये म्हणून पोलिसांनी युक्ती लढवली अन चोरी गेलेला हार अगदी अलगद मिळून दिला. पोलिसांच्या या युक्तीचे पोलीस उपायुक्तांनीसुद्धा कौतुक केले.

बुधवारी रात्री परिसरातील वृंदावन लॉनमध्ये लग्न समारंभ होता. जवळपास २०० पेक्षा जास्त पाहुणे होते.  नवरी सासरी गेल्यानंतर पाहुणेसुद्धा जाण्याच्या गडबडीत होते. दरम्यान, काटोल येथील एका महिलेने गळय़ातील ७ तोळय़ांचा सोन्याचा हार पिशवीत काढून ठेवला होता. तो हार  चोरीला गेला.  महिलेने अनेक नातेवाईकांना विचारपूस केली.

कुणीही काही सांगत नसल्यामुळे तिने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला.  सक्करदराचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप नागपूरे, चंद्रकांत कोडापे, प्रवीण ढुमने, मनोज, अतुल, आशीष, धर्मेद्र नितनवरे हे घटनास्थळावर पोहचले.  मात्र नवरीच्या वडिलांनी नातेवाईकांची बदनामी आणि लग्नात विघ्न नको म्हणून पोलिसांकडे आर्जव केली.  अखेर नागपूरे यांनी युक्ती लढवली. सर्व पाहुण्यांना सभागृहात गोळा केले आणि सांगितले की, समोर एक खोली आहे.

ज्यांनी कुणी हार चोरी केला असेल त्यांनी त्या खोलीच्या गादीखाली तो हार ठेवून बाहेर पडावे. असे केल्यास कुणावरही गुन्हा दाखल होणार नाही. त्यानुसार एक-एक नातेवाईक त्या खोलीत गेले. सर्व नातेवाईक खोलीतून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी खोलीची तपासणी केली. चोरी झालेला हार गादीखाली मिळून आला. अशा प्रकारने नातेवाईकांना न दुखावता चोरीचा छडा लावला गेला.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur police trick work to search necklace lost in wedding reception zws