नागपूर : एसआयआरवरून सुरू झालेले काँग्रेस व भाजप शहर अध्यक्षामधील आरोप प्रत्यारोपाचे रूपांतर आता वादात झाले आहे. हा वाद आता न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता वाढली आहे. काँग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी केलेल्या हातवाऱ्यावरून भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी थेट मानहानी दावा करणार असल्याचे मंगळवारी सांगितले. आता गुडधे माफी मागणार की कायदेशीर कारवाईला पुढे जाणार, याकडे लक्ष लागले असून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शहर भाजप अध्यक्ष तिवारी यांनी दिली ४८ तासांची मुदत
समाजमाध्यमावरून स्वत:ची चित्रफित प्रसारित करून हातवारे करीत स्थायी समिती सभापती असताना भ्रष्टाचाराचा आरोप केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी ४८ तासांत पुरावे द्यावे नाहीतर माफी मागावी. माफी न मागितल्यास त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचे भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी जाहीर केले. प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तिवारी यांनी गुडधे यांच्या मुस्लिम, ओबीसी, दलित मतदार कमी करण्याचा आरोपावरही इशारा दिला. मतदारांचे ६ व ७ क्रमांकाचे अर्ज भरून भिवंडीतील मतदार याद्यांत समावेश करीत असल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे नमुद करीत गुडधे यांनी एका व्यासपीठावर येऊन याबाबत पुरावे द्यावे अन्य राजकीय सन्यास घ्यावा, असे तिवारी म्हणाले.
गुडधे विक्षिप्तच, तिवारी यांची टीका
इतवारीत सराफा ओळीत अनेक बंगाली मुस्लिम कारागिर काम करतात. परंतु पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीत त्यांनी तिकडे मतदान केले. त्यांना नागपुरात मतदान यादीत नावाबाबत विचारले असता त्यांनी नागपुरात मतदार यादीत केवळ नवीन पिढीच्या नावाचा समावेश करण्याबाबत सांगितले. त्यामुळे यावर गुडधे यांनी बोलावे, असेही ते म्हणाले. लोकांमध्ये भ्रम पसरविण्याचे काम गुडधे करीत असल्याचे नमुद करीत त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलिस एन्काऊंटरची भीती गुडधेंनी व्यक्त केली होती. हा विक्षिप्तपणा नाही तर काय, असे तिवारी म्हणाले.
हातवारे करीत काय म्हणाले गुडधे?
गुडधे यांनी त्यांच्या समाजमाध्यम खात्यावरून एक चित्रफित प्रसारित केली. यात त्यांनी दयाशंकर तिवारी ‘स्टँडिंग कमिटी’मध्ये (स्थायी समिती) असताना त्यांची ‘अंडरस्टँडिंग’ किती आहे हे जवळून बघितले आहे असे नमुद केले. ‘अंडरस्टँडिंग’ या शब्दावर भर देत गुडधे यांनी उजव्या हाताने पैसे मोजावे असे हातवारे केले. त्यामुळे राजकारण तापले.
नेमकं प्रकरण काय?
गुडधे यांनी मागील आठवड्यात बुधवारी मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेसाठी भाजपने बाहेरून सुमारे ५०० कार्यकर्ते आणल्याचा आरोप केला होता. त्यावर तिवारी यांनी गुरुवारी गुडधे यांच्यावर हल्ला चढवला होता. काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांच्यासोबत महापालिकेत काम केले. ते अभ्यासू नगरसेवक होते. परंतु शहर अध्यक्ष झाल्यापासून ते बिनबुडाचे आरोप करीत असून त्यांना आता मानसोपचाराची गरज आहे, अशी टीका तिवारी यांनी केली होती. त्यानंतर गुडधे यांनी चित्रफित प्रसारित करून हातवारे करीत तिवारी यांच्यावर निशाणा साधला.
