नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना, विशेषत: दुचाकीधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ असलेले दक्षिण-पश्चिम नागपूरही अपवाद नाही. महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दिलास्याची शक्यता धुसर झाल्याने संतप्त कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चौकांमध्ये खड्ड्यांचे बॅनर झळकावले. त्यामुळे नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

बॅनरवरील मजकूराने वेधले अनेकांचे लक्ष

कॉंग्रेसने दक्षिण-पश्चिम नागपुरातील नागोबा चौकात लावलेल्या बॅनरवर प्रभाग ३७ मध्ये भव्य खड्ड्यांचा उद्घाटन सोहळा असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या बॅनरकडे जात आहे. ‘खड्ड्यांमुळे नागरिकांचा त्रास, हाच आहे प्रभाग ३७ मधील नगरसेवकांचा विकास’ असे लिहून नगरसेवकांनाही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी डिवचले आहे. या प्रभागात प्रा. दिलीप दिवे, संजय उगले, अश्विनी जिचकार व निधी तेलगोटे नगरसेवक आहेत. या चारही नगरसेवक गायब असल्याचे संकेत बॅनरवरून दिले आहे.

काय म्हणाले कॉंग्रेस कार्यकर्ते?

दक्षिण-पश्चिममधील कॉंग्रेसचे पदाधिकारी मंगेश कामोने यांनी प्रभाग ३७ मध्ये गोपालनगर, सुभाषनगरात मोठे खड्डे पडले असून दुचाकीधारकांवर अपघाताची टांगती तलवार असल्याचे सांगितले. खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. परंतु दखल घेतली नाही. आज बॅनर झळकताच महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाचे खड्डे बुजविणारे वाहन आले. आम्ही दिलेल्या निवेदनावर महापालिकेचे वाहन आले. परंतु प्रभागातील दोन नगरसेवक पुढे पुढे करीत होते, असा आरोप त्यांनी केला. इतर दोन नगरसेवक गायब असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खड्ड्यांमधील पाणी न काढताच डांबरयुक्त गिट्टी त्यात भरल्याने नारेबाजी केल्याचेही ते म्हणाले.

बुजवल्यानंतर पुन्हा खड्डे तयार

जुलै महिन्यात सातशे खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केला. परंतु दहा झोनमध्ये केलेल्या सर्वेक्षणात १२८२ खड्डे आढळून आल्याने निकृष्ट डांबरीकरणाचे पितळ उघडे पडले. विशेष म्हणजे, हा महापालिकेचा आकडा असून डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. शहरातील उड्डाणपूलही अपवाद नसून दुचाकीधारकांवर अपघाताची टांगती तलवार आहे.

हॉट मिक्स विभागाची कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात

महापालिकेच्या ‘हॉटमिक्स’ विभागाने २८ जुलैपर्यंत विविध झोनमध्ये ६९८ खड्डे बुजवण्याचा दावा केला. यात विभागाच्या नोंदीनुसार सर्वाधिक १६३ खड्डे नेहरूनगर झोनमध्ये बुजवण्यात आले. मंगळवारी झोनमध्ये १४४, धरमपेठमध्ये १०७, हनुमाननगरमध्ये ७८, धंतोलीत ७०, आशीनगरमध्ये ५२, सतरंजीपुरामध्ये २६, गांधीबागमध्ये १६ आणि लकडगंजमध्ये १३ खड्डे बुजवण्यात आले. मात्र, नुकताच महापालिकेच्या दहाही झोनमध्ये करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात १,२८२ खड्डे असल्याचे आढळून आले. या सर्वेक्षणात धरमपेठ झोनमध्ये सर्वाधिक ३५३ खड्डे असल्याचे आढळले. त्यानंतर हनुमाननगरमध्ये २८०, नेहरूनगरमध्ये १४७, लक्ष्मीनगरमध्ये १३८, आशीनगर १२५, मंगळवारीमध्ये ११९, धंतोलीत ६७, गांधीबाग २८, सतरंजीपुरामध्ये १६ आणि लकडगंज झोनमध्ये १५ खड्डे आढळून आले. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाचा दर्जा आणि टिकाऊपणा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विखुरलेली बारीक गिट्टी जीवघेणी

हॉटमिक्स प्लांट विभागाने अलीकडेच दुरुस्ती करूनही, या रस्त्यावर पुन्हा अनेक खड्डे पडले आहेतच, याशिवाय खड्ड्यांतील बारिक गिट्टी रस्त्यावर विखुरलेली असून दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहेत. खड्डे दुरुस्ती निष्फळ ठरल्याने केवळ अपघातांचा धोकाच वाढला नाही, तर धूळ-प्रदूषणाची समस्याही गंभीर झाली असल्याचे चित्र आहे. डांबरी रस्त्यांचा पृष्ठभाग उखडल्यामुळे गिट्टीवरून दुचाकी घसरण्याची शक्यता बळावली आहे.