नागपूर : एका क्षणात झालेल्या भीषण रस्ता अपघाताने ३४ आठवड्यांच्या गर्भवती योगिता साहू यांच्यासमोर जीव-मरणाचा प्रश्न उभा ठाकला. मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक होती. मात्र, त्यांच्या पोटात नऊ महिन्यांच्या उंबरठ्यावर असलेले बाळही तितक्याच धोक्यात होते. अशा वेळी डॉक्टरांनी आधी सिझेरियनद्वारे बाळाचा सुरक्षित जन्म घडवून आणला आणि त्यानंतर लगेच मेंदूची शस्त्रक्रिया करून आईचे प्राण वाचवले. या दुहेरी आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे आई आणि नवजात मुलीला नवजीवन मिळाले.

नेमके काय घडले?

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील तुर्कीखापा येथील २४ वर्षीय योगिता साहू या पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करत होत्या. नागपूर-छिंदवाडा महामार्गावर एका मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी त्या ३४ आठवड्यांच्या गर्भवती होत्या.

डॉक्टरांसमोर नेमके आव्हान काय होते?

रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेंदूच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले. ही जीवघेणी अवस्था असल्याने तातडीने मेंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मात्र, गर्भावस्थेचा कालावधी अंतिम टप्प्यात असल्याने आईच्या पोटातील बाळालाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे डॉक्टरांसमोर एकाच वेळी दोन जीव वाचविण्याचे मोठे आव्हान होते.

डॉक्टरांनी निर्णय कसा घेतला?

रुग्णाची प्रकृती स्थिर केल्यानंतर आणि कुटुंबीयांना परिस्थितीची माहिती दिल्यानंतर डॉक्टरांनी दुहेरी आपत्कालीन शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. प्रथम सिझेरियन प्रसूती करून बाळाचा सुरक्षित जन्म घडवून आणण्यात आला. त्यानंतर गर्भाशय बंद करून लगेचच मेंदूतील साचलेले रक्त काढण्यासाठी मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर काय झाले?

योगिता यांनी २.१ किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला. शस्त्रक्रियेनंतर त्यांना तीन दिवस अतिदक्षता विभागात ठेवून उपचार करण्यात आले. काही दिवसांत त्यांना शुद्ध आली आणि प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली. नवजात बाळालाही विशेष नवजात अतिदक्षता विभागात आवश्यक उपचार देण्यात आले. आठवडाभरानंतर आई आणि मुलगी दोघांनाही प्रकृती स्थिर झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

डॉक्टरांनी काय सांगितले?

डॉ. हुसेन भाटी यांनी, मेंदूतील रक्तस्राव ही अत्यंत गंभीर अवस्था असून वेळेत उपचार न मिळाल्यास ती जीवघेणी ठरू शकते. वेळेवर निदान, तातडीची शस्त्रक्रिया आणि विविध विभागांतील डॉक्टरांच्या समन्वयामुळे आई आणि बाळाचे प्राण वाचविणे शक्य झाल्याचे सांगितले. डॉ. साक्षी बन्सल यांनी, आई आणि गर्भातील बाळाची सुरक्षितता राखत निर्णय घेणे हे सर्वात मोठे आव्हान होते, असे नमूद केले. तर डॉ. कौस्तुभ बहातकर यांनी, ३४ आठवड्यांत जन्मलेल्या बाळावर तातडीने विशेष नवजात उपचार करण्यात आल्याने त्याची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले.

हे प्रकरण का ठरले विशेष?

एका गर्भवती महिलेवर एकाच वेळी सिझेरियन प्रसूती आणि मेंदूची आपत्कालीन शस्त्रक्रिया करून आई व बाळाचे प्राण वाचविणे ही अत्यंत दुर्मीळ घटना मानली जाते. विविध वैद्यकीय विभागांतील डॉक्टरांच्या समन्वयातून हे यश मिळाल्याचे मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूरने नमूद केले.