नागपूर : राज्यातील सगळ्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत रुग्णांना बाह्यरुग्ण विभागाचे कार्ड काढण्यासाठी तास-दोन तास रांगेत उभे राहावे लागायचे. आता हा त्रास टळणार असून रुग्णांची नोंदणी ‘क्यूआर कोड स्कॅन’ करून होणार आहे. या योजनेबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपूर, महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांसाठी आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर कार्ड (आभा) नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. हे कार्ड असलेल्यांसाठी वैद्यकीय शिक्षण खात्याकडून सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांत ‘क्यूआर कोड’ नोंदणीचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हे कार्ड असलेल्यांना बाह्यरुग्ण विभागातील नोंदणी कक्षात जावे लागेल. येथे बारकोड स्कॅन करताच संबंधित रुग्णाबाबतची सगळी माहिती स्वयंचलित पद्धतीने संकेतस्थळावर येईल.

त्यामुळे रुग्णाच्या नोंदणीसाठीचा वेळ वाचेल. येत्या काळात रुग्ण स्वत: स्कॅन करून ऑनलाईन पैसेही भरू शकतील. त्यामुळे रांगेत लागण्याची गरज भासणार नाही. नागपुरातील मेडिकलमध्येही हा प्रकल्प सुरू झाला आहे. त्यासाठीचे स्कॅनर वैद्यकीय शिक्षण खात्याकडून उपलब्ध करण्यात आले आहे. हे स्कॅन केल्यावर रुग्णाच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर ओटीपी येईल. त्यामुळे रुग्णांची माहितीही सुरक्षित राहणार आहे. दरम्यान राज्यातील इतरही अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. त्यामुळे योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी झाल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रुग्णाच्या आजाराशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर

आभा कार्डवर आजार, उपचाराबाबतच्या सर्व अहवालासह इतर माहिती असेल. त्यामुळे रुग्णांना ही माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर अपलोड करावी लागेल. भविष्यात रुग्ण भारताच्या कोणत्याही भागात उपचारासाठी गेल्यास एका क्लिकवर डॉक्टरांना रुग्णाची सर्व माहिती मिळेल व अचूक उपचार होण्यास मदत होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे काय म्हणतात ?

मेडिकल रुग्णालयात या प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काळात रुग्णांना रांगेत उभे रहावे लागणार नाही. त्यासाठी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये विशेष लक्ष देत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.