नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयाद्वारे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना लोकसंख्या मोजणी संदर्भात जबाबदारी देण्यात आली. सदर जबाबदारी देत असताना प्राध्यापकाचा पदाचा सन्मानाचा विचार न करता आणि परीक्षेतील संवेदनशील वेळेचा विचार न करता जबाबदारी देण्यात आल्याने प्राध्यापकांनी जनगणनेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.
विद्यापीठ शिक्षण मंचाच्या वतीने डॉ. कल्पना पांडे व डॉ. सतीश चाफले यांच्या नेतृत्वात दाेनशे प्राध्यापकांसह विविध मागण्यांना घेऊन कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांना निवेदन दिले. ज्यात विशेषत जनगणना कार्य मुक्ती व पदभरती पदमान्यता यावर भर देण्यात आला.
बहिष्काराचे कारण काय?
महाविद्यालयीन प्राध्यापकांना राज्यातील लोकसंख्या मोजणीचे काम देण्यात आले आहे. वस्तूत: ही मंडळी विद्यापीठ परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, शिक्षण, प्रश्नपत्रिका तयार करणे, नियमन आदी महाविद्यालय व विद्यापीठ शैक्षणिक कामात व्यस्त आहे. तसेच १५ मे ला इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत स्वतः प्राध्यपकांना उपस्थित राहावे लागते. महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. विद्यार्थी परंपरागत अभ्यासक्रमपासून दूर होत चालला आहे. या पाश्वभूमीवार विद्यार्थी शोध मोहीम अनेक महाविद्यालयास राबवावी लागते. यावेळी जर प्राध्यापक जनगणना कामावर रुजू झाला तर महाविद्यालयांमधील प्रवेश कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी आपल्या नोकऱ्या वाचवाव्या की जनगणना करावी, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. या वेळी निवेदनात शिक्षण मंच अध्यक्ष डॉ. कल्पना पांडे, महामंत्री डॉ. सतीश चाफले, डॉ. योगेश भुते, डॉ. पांडुरंग डांगे यांचेसह प्राचार्य व दोनशेच्यावर प्राध्यापक, संघटन पदाधिकारी उपस्थित होते.
परीक्षेसंदर्भातही निवेदन
१५ एप्रिल पासून विद्यापीठाच्य उन्हाळी परीक्षा सुरू होत आहेत. परंतु, अजूनही वेळापत्रक आले नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे. हा प्रश्न कुलगुरू यांनी तात्काळ मार्गी लावावा. आचार्य पदवी प्रवेश परीक्षा मे महिन्यात होऊ घातली आहे. परंतु यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आपण कसे उपलब्ध करून देणार आहात. शंभरच्या वर प्राध्यापकाना मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे. परंतु, उच्चतम संशोधन केंद्र येथे समयोजन झाले नाही, त्यासंदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात, असे विविध प्रश्न कुलगुरूंना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले.
