नागपूर : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन रविवारी अधिकच चिघळले. सोमवारी देशभर आंदोलन सुरू असले तरी भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. अशातच नागपूरच्या संविधान चौकात लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या भूमीतून मोदींविरोधात घोषणा दिल्या. भर पावसात झालेल्या या आंदोलनाने संविधान चौक दणाणून सोडला.

मोदींविरोधात कोणत्या घोषणा देण्यात आल्या?

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या हटवण्याच्या निषेधार्थ तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सोमवारी नागपुरातील संविधान चौकात शेकडो युवकांनी आंदोलन केले. विद्यार्थी, युवक, कुटुंबीय, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनादरम्यान “मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी”, “धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो”, “वंदे मातरम्”, “आवाज दो हम एक हैं” तसेच “नरेंद्र मोदी वीक हैं, उसका पेपर लीक हैं” अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करत शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर संताप व्यक्त केला.

आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

सोनम वांगचुक यांना हटवण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या आवाजाची दखल घेतलेली नसल्याबद्दलही आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचाही निषेध यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांवरील कारवाई लोकशाहीविरोधी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा युवकांनी यावेळी दिला. आंदोलनादरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.