नागपूर: संसद मार्चदरम्यान जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यातील एक व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेढलेल्या एका आंदोलनकर्त्याला लाठ्यांनी मारहाण होत असताना तो वारंवार “मारा सर…”असे म्हणत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या आंदोलनकर्त्याची ओळख नागपूरच्या भारत बानाईत अशी झाली आहे. या देशात लोकशाही संपली असल्यामुळे माझ्या जगण्यालाच काही अर्थ नाही त्याच्यामुळे मला लाटीने मारण्यापेक्षा थेट गोळी घाला असा आक्षेपही त्या तरुणाने घेतला.

संसद भवन समोर नेमके काय घडले?

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)ने प्रश्नपत्रिका गळतीच्या प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेकडे मोर्चा काढला होता. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात लाठीचार्ज केला. आंदोलनकर्त्यांना पांगविण्यात आले, तसेच आंदोलनासाठी उभारलेले तंबूही हटवण्यात आले.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भारत बानाईत यांच्याभोवती सुरक्षा कर्मचारी जमा झाल्याचे दिसते. त्यांना लाठ्यांनी मारहाण होत असतानाही ते “मारा सर…” असे म्हणताना ऐकू येतात. काही वेळाने तिरंगा हातात असलेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याने हस्तक्षेप करून त्यांना तेथून दूर नेण्याचा प्रयत्न केल्याचेही व्हिडीओत दिसते.

मार खाणारा तरुण काय म्हणाला…

घटनेनंतर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना भारत यांनी, “माझ्या डोक्यावर आणि शरीराच्या प्रत्येक इंचावर मार बसला. सुमारे १५ ते २० रॅपिड अक्शन फोर्स (आरएएफ)च्या जवानांनी मला मारहाण केली. हे विद्यार्थ्यांचे आंदोलन असून त्यावर सरकारने केलेली कारवाई निषेधार्ह आहे,” असा आरोप केला. या देशातील लोकशाही संपलेली आहे. आपली हुकूमशाही कडे वाटचाल सुरू आहे. आम्ही सगळे तरुण आहोत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहात. मात्र या देशातील तरुणांवर अशा प्रकारे बळजबरी केली जात असेल तर हा कुठला न्याय आहे. त्यामुळे मला अशा देशात आता जगण्यातच अर्थ राहिलेला नाही. काठीने मारण्यापेक्षा मला थेट गोळी घालून मारून टाका अशी मागणी त्याने केली. तसेच मी स्वतः हिंदू असूनही माझ्यावर हल्ला करण्यात आला असेही तो म्हणाला.

कायदा सुव्यवस्थेचे दिले कारण

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना संयम बाळगण्याचे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव रंजन यांनी जारी केलेल्या संदेशात आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करण्याचे आणि पोलिसांच्या कायदेशीर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. याचदरम्यान, सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत सरकारमध्ये चर्चा करण्याचे आश्वासन नड्डा यांनी दिल्याचा दावा सौरव दास यांनी केला आहे.