नागपूर : दौंड-काष्टीदरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरण कामामुळे वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे गरीब रथ एक्सप्रेसनंतर नागपूर–पुणे एक्सप्रेस तसेच पुणे–अजनी व अजनी–पुणे हमसफर रेल्वेगाड्या २४ व २५ जानेवारी रोजी रद्द करण्यात आल्या. प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

दौंड-काष्टी विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामांसह आवश्यक अभियांत्रिकी व ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) कामांसाठी घेतल्या जाणाऱ्या वाहतूक ब्लॉकमुळे नागपूर-पुणे रेल्वेमार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयाचा थेट फटका प्रवाशांना बसला असून, नियोजित प्रवास विस्कळीत झाला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १२१३६ नागपूर–पुणे एक्सप्रेस ही गाडी २४ जानेवारी २०२६ रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच १२१३५ पुणे–नागपूर एक्सप्रेस २५ जानेवारी २०२६ रोजी धावणार नाही. याशिवाय २२१३९ पुणे–अजनी हमसफर एक्सप्रेस २४ जानेवारीला तर २२१४० अजनी–पुणे एक्सप्रेस २५ जानेवारीला रद्द करण्यात आली आहे. दौंड आणि काष्टीदरम्यान सुरू असलेल्या दुहेरी रेल्वेमार्गाच्या कामामुळे नागपूर–पुणे या अतिव्यस्त मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या विलंबाने धावत आहेत. परिणामी प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले असून अनेकांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर नागपूर–पुणे गरीबरथ एक्सप्रेसही शुक्रवारी रद्द करण्यात आली. ही गाडी नेहमी रविवार, मंगळवार आणि शुक्रवार अशा तीन दिवस नागपूरहून धावते. त्याचप्रमाणे पुणे–नागपूर गरीबरथ एक्सप्रेस २५ जानेवारी रोजी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने अनेक प्रवाशांनी खासगी बससेवांकडे मोर्चा वळवला आहे.

महाराष्ट्रातील नागपूर–पुणे रेल्वेमार्ग हा सर्वाधिक व्यग्र मार्गांपैकी एक मानला जातो. या मार्गावरून पुणे, नागपूर, अमरावती आणि अजनीदरम्यान दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. २४ आणि २५ जानेवारी या दोन दिवसांत सर्वाधिक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. नागपूर-पुणे एक्सप्रेस, पुणे–अजनी हमसफर, अजनी-पुणे हमसफर तसेच अजनी-पुणे आणि अमरावती-पुणे मार्गावरील काही गाड्यांचेही रद्दीकरण करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने ही रद्दीकरणे पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण, सुरक्षितता वाढवणे आणि भविष्यातील रेल्वे वाहतूक अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तात्पुरत्या काळात तरी प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.