नागपूर : नागपूर व पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यावरून आता भाजपमध्ये चिंतनाला सुरुवात होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच याबाबत संकेत दिले असून प्रयत्न नेमके कुठे कमी पडले, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमुद केले.
‘काहीतरी कमतरता राहिली’
पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालानंतर गुरुवारी महसूलमंत्री बावनकुळे पुण्यात एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव स्वीकारत त्यांनी या पराभवाचे सखोल चिंतन करणार असल्याचे स्पष्ट केले. नागपूर आणि पुणे या दोन्ही पदवीधर मतदारसंघांतील निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेच्या होत्या. या दोन्ही जागांवर विजय मिळविण्याच्या उद्देशाने नियोजनबद्ध तयारी करण्यात आली होती. संघटनेचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी प्रचारात उतरले होते. मात्र, एवढे प्रयत्न करूनही काहीतरी कमतरता राहिली, अशी कबुली बावनकुळे यांनी दिली.
उणिवांचा आढावा घेण्याचे संकेत
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. या निकालामुळे भाजपच्या गोटात आत्मपरीक्षणाची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी पराभव स्वीकारत संघटनात्मक पातळीवर झालेल्या प्रयत्नांचा आणि उणिवांचा आढावा घेण्याचे संकेत दिले. नागपूरची जागा काँग्रेसकडे होती. पुण्याची जागादेखील भाजपकडे नव्हती. तरीही या दोन्ही जागा पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या होत्या. या जागांवर विजय मिळविण्याच्या दृष्टीनेच नियोजन करून निवडणुकीची तयारी करण्यात आली होती. मात्र, निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही, असे ते म्हणाले.
नागपुरात मी प्रभारी, पराभवाची जबाबदारी स्वीकार
झालेला पराभव आम्ही स्वीकारला आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मीच प्रभारी होतो, त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात आली होती. संघटनेचे कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी प्रचारात सक्रिय होते. नियोजन आणि प्रचार यंत्रणा राबविण्यात आली होती. असे असतानाही निकाल पक्षाच्या बाजूने लागला नाही. त्यामुळे नेमकी कोणती कमतरता राहिली, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपुरात वंजारी विजयी
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या पार पडलेल्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या मतमोजणीचा निकाल तब्बल ४१ तासानंतर गुरुवारी पहाटे लागला. अपक्ष नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर स्वार होऊन अभिजित वंजारी यांनी विजयी झेंडा फडकवत विधान परिषदेतील मार्ग मोकळा केला. कराळे यांना मिळालेल्या मतांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या बळावर एकूण ६७,२३१ मते वंजारी यांच्या पारड्यात पडली. त्यांनी सुधाकर कोहळे यांना ३,२७१ मतांनी मागे टाकत विजय मिळवला.
काँग्रेसचा सलग दुसरा विजय
५८ वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मागील २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना ६१,७०१ तर भाजपचे संदीप जोशी यांना ४२,७९१ मते मिळाली होती. त्या निवडणुकीत १८,९१० मतांनी त्यांनी विजय मिळवला होता. ही निवडणूक त्या तुलनेत चुरशीची झाली. केवळ ३,२७१ मतांनी विजय मिळाला.
