अकोला : रेल्वे प्रवाशांना पुन्हा एकदा मोठ्या डोकेदुखीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेकडून तांत्रिक कामासाठी पुन्हा एकदा विशेष ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर – पुणे दरम्यान धावणाऱ्या गाडीच्या फेऱ्या रद्द केल्या असून इतरही गाड्यांवर परिणाम होणार आहेत.
अभियांत्रिकी व सिग्नलिंगचे काम केले जाणार
मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे यार्ड येथे विद्यमान रेल्वे संरचनेतील डीडीएस (DDS) पॉइंट क्रमांक २०८/२०९ बदलण्यासाठी तसेच यार्डमधील सिग्नल व पॉइंट व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी डीसीएन अंतर्गत महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी व सिग्नलिंग काम हाती घेण्यात येणार आहे. या कार्यासाठी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून त्यासाठी काही गाड्याच्या परिचालनावर परिणाम होणार आहेत.
पुणे ते नागपूर व नागपूर ते पुणे गाडी धावणार नाही
१. गाडी क्रमांक १२१३६ – नागपूर – पुणे फेरी (१३ जून) – रद्द
२. गाडी क्रमांक १२१३५ – पुणे – नागपूर एक्स्प्रेस (१४ जून) – रद्द
३. गाडी क्रमांक ११०७८ – जम्मूतवी – पुणे एक्स्प्रेस (१२ जून) – हडपसर येथे शॉर्ट टर्मिनेशन, हडपसर-पुणे रद्द
४. गाडी क्रमांक ११४०६ – अमरावती पुणे एक्स्प्रेस (१३ जून) – हडपसर येथे शॉर्ट टर्मिनेशन, हडपसर-पुणे रद्द
५. गाडी क्रमांक २२१७१ – पुणे-राणी कमलापती एक्स्प्रेस (१४ जून) – दुपारी ३.१५ ऐवजी संध्याकाळी ७.५५ ला पुण्याहून सुटेल
ब्लॉक पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी आवश्यक
‘ब्लॉक’ रेल्वे पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी तसेच सुरक्षित रेल्वे संचालनासाठी अत्यावश्यक आहेत. या कामांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या कामामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन त्यावर मोठा परिणाम होणार आहे. सध्या सुट्टीच्या हंगामामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. इतर रेल्वे गाड्यांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
