नागपूर : रेल्वे आणि रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. १० नोव्हेंबरपासून दोन रेल्वे फाटक कायमचे बंद होणार असून, पर्यायी मार्ग म्हणून नव्या उड्डाणपुलाचा वापर करावा लागणार आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कलमना-नागपूर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन-नागपूर या रेल्वेमार्गांवरील दोन मानवी नियंत्रणाखालील रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. रेल्वे फाटक क्रमांक ५७० (किलोमीटर ११२८/६-८) आणि रेल्वे फाटक क्रमांक ५७२ (किलोमीटर ११२८/३३-३५) हे दोन्ही फाटे १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सर्व प्रकारच्या रस्ते वाहतुकीसाठी बंद होतील.
दोन्ही रेल्वेमार्गांवरील वाहतुकीत बदल
कलमना-नागपूर रेल्वेमार्गावरील फाटक क्रमांक ५७० आणि इतवारी-नागपूर रेल्वेमार्गावरील फाटक क्रमांक ५७२ यांचा वापर परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांकडून केला जातो. मात्र, आता या दोन्ही फाटकांवरून दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या रस्ते वाहतुकीला परवानगी राहणार नाही. निर्धारित वेळेनंतर या फाटकांमधून रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार असल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल.
नव्या उड्डाणपुलावरूनच वाहतूक
दोन्ही रेल्वे फाटकांमधून होणारी रस्ते वाहतूक आता नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून वळविण्यात येणार आहे. रेल्वे फाटकांवरील वाहतुकीची कोंडी आणि रेल्वेच्या सुरक्षिततेशी संबंधित संभाव्य धोके कमी करण्याच्या दृष्टीने हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना १० नोव्हेंबरपासून आपल्या प्रवासाचे नियोजन नव्या उड्डाणपुलाच्या मार्गानुसार करावे लागणार आहे.
नागरिकांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन
रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरक्षित, सुकर तसेच विनाअडथळा ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि नियमित प्रवाशांनी १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणाऱ्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बंद होणाऱ्या दोन्ही रेल्वे फाटकांऐवजी नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलाचा वापर करावा. वाहतुकीतील हा बदल लक्षात घेऊन वाहनचालकांनी निर्धारित वेळेपूर्वीच पर्यायी मार्गाची माहिती घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
